एकदा राजा काही दरबाऱ्यांबरोबर शिकारीला निघाला. सोबत प्रधान मुल्ला नसरुद्दीनही होता. तो हुशार असल्यामुळे खुद्द राजा आणि बरेच दरबारी त्याच्यावर खार खाऊन होते. शिकारीला निघताना राजाने एक डाव आखला. मुल्लाला जाणीवपूर्वक एक मरतुकडा आणि अतिशय आळशी घोडा दिला. सगळे निघाले तेव्हा मुल्ला सोडून बाकीचे घोडे दौडवत कधीच दृष्टीआड झाले.
तेवढ्यात पाऊस आला. मुल्ला चिंब भिजला. घोड्याच्या मंदगतीमुळे तो घरापासून फार लांब गेला नव्हताच. त्याने घोड्याला वळवलं आणि तो घरी जाऊन कपडे बदलून आला. पावसाची झड कमी झाल्यावर पुन्हा घोड्यावर बसून निघाला. एव्हाना राजा आणि अन्य दरबारी नखशिखांत भिजून, काकडत परतत होते. त्यांना मुल्ला सुक्या कपड्यांमध्ये दिसला, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला.
राजाने विचारलं, तू पावसात भिजला नाहीस? असं कसं झालं?
मुल्ला म्हणाला, महाराज, ही सगळी या घोड्याची कृपा आहे. काय अद्भुत घोडा आहे हा. याला काहीतरी वेगळीच दैवी शक्ती प्राप्त आहे. याला पावसाच्या संततधारांमधल्या सुक्या जागाही कळतात आणि तो आपसूक त्या सुक्या जागांमधून चालतो. माझ्या अंगावर पाण्याचा एक थेंब पडू नाही दिला त्याने.
राजा हिरमुसला. मुल्लावर डाव टाकला, तो घोड्यामुळे उलटला, याचं त्याला फार वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी शिकारीला जाताना आपण त्या घोड्यावरूनच जाणार, असं त्याने जाहीर केलं.
दुसऱ्या दिवशी मुल्ला वेगवान घोडा घेऊन सुसाट निघून गेला. राजा मरतुकड्या घोड्यावर बसला. त्याचे सगळे चमचे दरबारीही त्याच्याचसोबत हळुहळू दुडक्या चालीने चालत असताना पाऊस धो धो कोसळला आणि त्यात राजा पुन्हा चिंब भिजला.
मुल्ला नसरुद्दीन शिकार करून आनंदाने शीळ घालत परत आला, तेव्हा राजा म्हणाला, तू मला फसवलंस. त्या घोड्याच्या अंगात कसलीही दैवी शक्ती नाही.
मुल्ला म्हणाला, मी सुका होतो ना काल? म्हणजे मी खोटं बोललो नाही, हे तर स्पष्ट आहे. तुम्ही फक्त घोड्यावरच विसंबून राहिलात का? त्यामुळेच असं झालं असणार. मी फक्त घोड्यावर विसंबून नाही राहिलो. मी माझ्या बाजूनेही काही गोष्टी केल्या, त्यामुळे मी सुका राहिलो.
राजाने विचारलं, काय केलं होतंस तू?
मुल्ला म्हणाला, मी जे करायचं ते केलं. तुम्ही जे काही करायचं ते तुमचं तुम्हाला सुचायला हवं. सगळं काही मी आणि घोडाच करणार असू तर तुम्ही आयुष्यभर भिजतच राहाल.
~ ओशो


