अँटी-बकेट लिस्ट : सगळंच हवं असण्यापासून मिळणारं स्वातंत्र्य

मूळ इंग्रजी लेखन : डॉ. प्रसाद राजहंस

काही वर्षांपूर्वी यशाची व्याख्या तुलनेने सोपी होती — चांगलं शिक्षण घ्या, नोकरी करा, कुटुंब उभारा आणि आदराने जीवन जगा. आज मात्र यशाच्या शेकडो व्याख्या तयार झाल्या आहेत.

कोणी मॅरेथॉन धावत आहे. कोणी आयर्नमॅन पूर्ण करत आहे. कोणी हिमालयात ट्रेकिंग करत आहे. कोणी स्कायडायव्हिंग. कोणी जगभर फिरत आहे. कोणी ४५ व्या वर्षी गिटार शिकत आहे.

सोशल मीडिया उघडला की प्रत्येकजण काहीतरी असामान्य जगत असल्यासारखं वाटतं आणि नकळत प्रश्न पडतो: “मी काहीतरी मिस तर करत नाही ना?” मग मन नवीन यादी बनवू लागतं — अजून प्रवास करायला हवा. ट्रेकिंग करायला हवं. संगीत शिकायला हवं. अधिक अनुभव घ्यायला हवेत.
हीच आधुनिक “बकेट लिस्ट”.

पण या धावपळीत एक प्रश्न शांतपणे स्वतःला विचारायला हवा: “ही सगळी कामं माझ्या यादीत असायलाच हवीत असं ठरवलं कुणी?”

माझा एक मित्र म्हणाला होता:
“मी पहाटे चारला उठून जंगलात वाघाच्या मागे का फिरू?” त्याला वाइल्डलाईफ सफारीचं आकर्षण वाटत नव्हतं. दुसऱ्या कोणासाठी मात्र ते आयुष्यभराचं स्वप्न असू शकतं.
दोघंही चुकीचे नाहीत. कारण प्रत्येक माणूस सारख्याच गोष्टींमध्ये आनंद शोधण्यासाठी बनलेला नसतो.
काहींना साहस आवडतं. काहींना ध्यानधारणा. काहींना पर्वत. तर काहींना समुद्रकिनारी शांत बसणं. कोणी वीस देश फिरतं. तर कोणी एका छोट्या गावात आठवडा घालवून तिथली माणसं आणि शांतता अनुभवतं. काही लोक खरंच घरात राहण्यात सर्वात आनंदी असतात. आणि शांतपणे अनुभवलेला आनंद हा सार्वजनिकरित्या दाखवलेल्या आनंदापेक्षा कमी मौल्यवान नसतो.

आपल्यापैकी अनेकांचं बालपण साध्या आनंदात गेलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या. टीव्हीवर लागणारा चित्रपट. आईस्क्रीम खायला जाणं. लहान गोष्टी खास वाटायच्या कारण त्या दुर्मिळ होत्या. आज मात्र आपल्याकडे अमर्याद पर्याय आहेत — प्रवास, मनोरंजन, माहिती, अनुभव. पण अमर्याद पर्याय अनेकदा अमर्याद दबाव निर्माण करतात. मानसशास्त्रात याला “Choice Overload” म्हणतात — खूप पर्याय समाधानाऐवजी अस्वस्थता वाढवतात.

कारण एकदा सगळंच शक्य झालं की प्रत्येक अनुभव घ्यायची जबाबदारी माणूस स्वतःवर घेतो. पण वास्तव असं आहे की कोणताही माणूस सगळं काही करू शकत नाही. प्रत्येक देश फिरता येत नाही. प्रत्येक कौशल्य शिकता येत नाही. प्रत्येक अनुभव घेता येत नाही. प्रत्येक आयुष्य जगता येत नाही.

कदाचित इथेच “अँटी-बकेट लिस्ट” ही कल्पना महत्त्वाची ठरते. ती निराशावाद नाही. ती आळस नाही. ती महत्त्वाकांक्षेचा अभाव नाही. ती म्हणजे अशा गोष्टींबद्दल घेतलेला जाणीवपूर्वक निर्णय ज्या केल्याशिवायही स्वतःला परिपूर्ण वाटू शकतं.

कदाचित तुमची अँटी-बकेट लिस्ट अशी असेल:

• मला मॅरेथॉन धावायची गरज नाही. • मला पन्नास देश फिरायची गरज नाही. • मला प्रत्येक छंद शिकायची गरज नाही. • मला प्रत्येक अनुभवाचं “कंटेंट” बनवायची गरज नाही. • मला सार्वजनिक पुरावा द्यायची गरज नाही की माझं जीवन चांगलं चाललंय. आणि गंमत म्हणजे “हे मला नको आहे” असं म्हणण्यात कधी कधी खूप शांतता असते.

आज लोक कधी कधी क्षण जगण्यापेक्षा ते टिपण्यात जास्त व्यस्त होतात. सूर्यास्त “कंटेंट” बनतो. प्रवास “पुरावा” बनतो. सुट्टी “डॉक्युमेंटेशन” बनते. आणि त्या सगळ्यात प्रत्यक्ष अनुभव हरवतो.
कदाचित आयुष्यातले काही सर्वात अर्थपूर्ण क्षण ते असतात जे कधी पोस्टच केले जात नाहीत. फक्त जगले जातात. फक्त अनुभवले जातात. फक्त आठवणीत राहतात.

कदाचित अँटी-बकेट लिस्टचा उद्देश एवढाच असावा: आयुष्य मर्यादित करणं नाही. तर अनावश्यक दबाव कमी करणं. प्रत्येक शक्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न थांबवून स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करणं.

कारण शेवटी समाधान हे किती बॉक्स टिक केले यावर अवलंबून नसतं.तर कोणते बॉक्स टिक करणं कधीच गरजेचं नव्हतं हे समजण्यात असतं.

ह्या लेखातील विचार ह्या संस्कृत सुभाषितातून अगदी छानपणे व्यक्त होतो:

दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सितापि मधुरैव । तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ॥

अर्थ – दही गोड आहे. मध गोड आहे. द्राक्षे गोड आहेत. साखरही गोडच आहे. परंतु ज्याचं मन जिथे जडलं आहे त्याच्यासाठी तेच सर्वांत गोड असतं.

error: Content is protected !!