जीवनाचं खरं सौंदर्य त्याच्या अनिश्चिततेत आहे. जर सगळं ठरलेलं आणि शाश्वत असतं, तर त्यातलं रोमांच, आनंद आणि शिकणं संपलं असतं. अनिश्चिततेमुळेच प्रत्येक दिवस नवा असतो, प्रत्येक क्षणाला अर्थ मिळतो. अशाश्वत म्हणजे सतत बदलत राहणारं, तर शाश्वत म्हणजे ठरलेली आणि निश्चित गोष्ट. आणि आपल्याला माहीत असलेली ती एक गोष्ट म्हणजे जीवनाची मर्यादा—जी आपल्याला अधिक सजग आणि संवेदनशील बनवते.
नाती, मैत्री आणि ऐहिक सुखं यांची खरी जाणीव त्यांची अनिश्चितता स्वीकारली तरच होते. जर नाती कायम टिकणारच असती, तर प्रेम, आपुलकी आणि जपण्याची गरजच वाटली नसती. नाती बदलू शकतात, हे समजल्यावरच आपण त्यांना अधिक जपतो. मैत्रीतही हेच लागू होतं—मित्र नेहमी सोबत असतील, हे गृहीत धरलं, तर त्यांच्यासोबतच्या क्षणांचं मोल उरत नाही.
संपत्ती, यश किंवा आरामशीर जीवन गृहीत धरलं तर त्याची खरी किंमत जाणवणार नाही. जे मिळालं आहे, त्याचं समाधान न वाटता सतत काहीतरी कमी असल्याची भावना मनाला टोचणी लावत राहील. आयुष्य समृद्ध असलं तरी त्याचा आनंद घेण्याची क्षमताच मंदावेल, कारण सहज मिळालेल्या गोष्टींचं मोल मन स्वीकारत नाही.
भूतकाळात अडकण्यापेक्षा पुढे पाहणं महत्त्वाचं. अनिश्चितता अडथळा नसून नव्या शिकवणीची संधी आहे. नियोजन करा, पण अनिश्चिततेला स्वीकारा—कारण त्यातूनच जीवनाचं खरं सौंदर्य उमलतं.
हे जीवन सुंदर आहे…


