डोकं म्हणजे एक वादळ. सतत काही ना काही विचार, आठवणी, कामं, चिंता, कल्पना… चालूच असतं. “परवा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे”, “मिटींगसाठी रिपोर्ट पूर्ण करायचाय”, “आईला फोन करायचाय”… एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी डोक्यात ठेवून आपण खरंच शांत राहू शकतो का?
डेव्हिड अॅलन, “Getting Things Done” या जगप्रसिद्ध पद्धतीचा जनक, यावर म्हणतो – तुमचं डोकं कामं करण्यासाठी आहे, साठवण्यासाठी नाही! आणि म्हणूनच तो सुचवतो एक सोपी, पण जबरदस्त सवय – ब्रेन डंप.
ब्रेन डंप म्हणजे काय? डोक्यात जे काही सुरू आहे ते थेट कागदावर उतरवणं. अगदी जसंच्या तसं. विचार, चिंता, करायच्या गोष्टी, कल्पना, न विसरायचं असं काही, इतरांना सांगायचंय असं काही – सगळं लिहून टाका.
हे करताना ना काही फिल्टर, ना नीटशा वाक्यांची गरज. फक्त तुम्ही आणि तुमचे विचार.
एकदा का डोकं रिकामं केलं, की शांतपणा जाणवतो. काय खरंच महत्त्वाचं आहे, ते दिसायला लागतं. गोंधळ कमी होतो, आणि तुमची ऊर्जा खरी गरज असलेल्या कामांवर केंद्रित होते.
ब्रेन डंप करण्यासाठी फक्त १०-१५ मिनिटं आणि एक वही किंवा मोबाईलचं नोट्स अॅप पुरेसं आहे. कधी करायचं याला नियम नाही – सकाळी उठल्यावर, झोपण्याआधी, किंवा जेव्हा तुमच्या मनात भाऊगर्दी वाटते तेव्हा.
आणि हो, ब्रेन डंप झाल्यावर त्याकडे नजर टाका. काही गोष्टी तातडीनं करायच्या असतील, त्या प्लॅन करा. काही फक्त लिहून झाल्यानंच हलकं वाटेल. आणि काही विचार तुम्हाला नवीन दिशा देतील.
ही एक अशी पद्धत आहे जी तणाव कमी करते, फोकस वाढवते आणि तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणते.
तर एकदा करून बघा. एकदा लिहून टाका. कदाचित तुम्ही काही विसरलेलं आठवेल, कदाचित काही नको ते विसराल. पण नक्कीच – डोकं हलकं होईल.


