एक कोल्हा एकदा एका खारीपुढे उभा राहून म्हणाला, आता तुझी खैर नाही, मी कोल्हा आहे, तुझा चट्टामट्टा करून टाकणार.
शक्यतो कोल्हा दिसताच खारी पळत सुटायच्या. ही खार मात्र धावली नाही, तिथेच थांबली आणि म्हणाली, तू कोल्हा आहेस हे कोणी ठरवलं? तुझ्याकडे काही प्रमाणपत्र आहे का?
कोल्हा चक्रावला. आजवर कोणत्याही खारीने कधी त्याच्यापुढे तोंड उचकटलं नव्हतं. ही खार मात्र कंबरेवर हात ठेवून त्याच्या कोल्हा असण्याविषयीच शंका घेत होती. त्याने त्याची सगळी हवाच गेली. फुस्स होऊन तो जंगलाचा राजा असलेल्या सिंहाकडे आला आणि म्हणाला, महाराज, मी कोल्हा आहे, याचं एक प्रमाणपत्र लिहून द्या प्लीज.
सिंहाने प्रमाणपत्र लिहून दिलं. ते घेऊन कोल्हा ऐटीत खारीपुढे येऊन उभा राहिला आणि एखादा खलिता वाचावा, तसं ते प्रमाणपत्र वाचू लागला, ऐक गं खारुटले, टु हूमसोएव्हर इट मे कन्सर्न, याद्वारे हे सर्व जंगलवासीयांना कळविण्यात येत आहे की सदर प्रमाणपत्र धारण करणारा प्राणी हा कोल्हा असून तो मांसाहारी आहे, चपळ, धाडसी शिकारी आहे आणि छोट्या प्राण्यांची शिकार करून खाण्याचे अधिकार त्याला बहाल करण्यात आलेले आहेत. आज्ञेवरून, सिंह महाराज…
कोल्हा हे नवलाईचं प्रमाणपत्र कौतुकाने वाचत असताना खारीने सूंबाल्या केला होता. खारीच्या या चीटिंगची तक्रार करायला कोल्हा पुन्हा एकदा सिंह महाराजांच्या दरबारात गेला. तिथे अजब प्रकार सुरू होता. तिथे एक हरीण सिंहाला विचारत होतं, तुम्ही सिंह आहात असं सांगताय. पण, तुम्ही सिंह असल्याचा पुरावा काय?
कोल्हा विचारात पडला. आपण कोल्हा असल्याचं सर्टिफिकेट सिंहाकडून मिळवू शकतो. सिंह हा सिंह असल्याचं सर्टिफिकेट कोण देणार?
सिंह हसून हरणाला म्हणाला, अरे मूर्ख हरणा, मी भुकेलेला असेन, तेव्हा तुला माझ्याकडे सिंह असल्याचं प्रमाणपत्र मागण्याइतका वेळही राहणार नाही आणि त्याची गरजही भासणार नाही. आणि जेव्हा मला भूक नसेल, तेव्हा तुला माझ्या सिंह असण्याविषयी काय शंका येते, याने मला शून्य फरक पडतो, आय डोन्ट केअर.
हरणाला काय तो अर्थबोध झाला आणि त्याने क्षणार्धात तिथून पळ काढला.
झाडामागून पुढे येत कोल्हा म्हणाला, महाराज, हे चीटिंग आहे. तुम्ही हरणाला जे सांगितलंत, ते मला का नाही सांगितलंत? मीही त्या खारीला असंच सुनावलं असतं. तुम्ही मला का सर्टिफिकेट दिलंत?
सिंह म्हणाला, मला काय माहिती तुला कशाकरता हवं होतं? तू मागितलंस म्हणून मी सर्टिफिकेट दिलं. मला काय माहिती की तुझ्याकडे खारीने ते मागितलेलं होतं. मला वाटलं तुझी एखाद्या माणसाशी गाठ पडली की काय? त्यांना फार हौस असते प्रमाणपत्रं वाटण्याची आणि ती महत्त्वाची मानण्याची.
-अज्ञात


