चांद्रयान: यश, अपयश आणि खऱ्या विजेत्याचा शोध

भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात चांद्रयान मोहिमांचे विशेष स्थान आहे. चांद्रयान-२च्या अपयशानंतर चांद्रयान-३चे यश देशासाठी अभिमानाची बाब ठरली. मात्र, या यशाच्या मुळाशी खऱ्या अर्थाने कोणाचा वाटा अधिक आहे, याचा विचार केला पाहिजे.

चांद्रयान-२चे नेतृत्व इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनी केले. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक अज्ञात अडचणी होत्या. लँडिंगच्या वेळेस विक्रम लँडरचे नियंत्रण सुटले आणि मोहीम अपूर्ण राहिली. हे अपयश दिसते तितकेच मोठे होते, कारण ही मोहीम पूर्ण न झाल्याने पुढील पावले नेमकी कुठे उचलायची, हे स्पष्ट नव्हते. संपूर्ण प्रक्रिया, प्रणाली आणि अडथळे समजून घेण्यासाठी संपूर्ण टीमला मोठ्या कष्टांमधून जावे लागले.

पुढे एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली चांद्रयान-३ची पुनर्बांधणी झाली. मात्र, येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी – यावेळी संपूर्ण इस्रो टीमला आधीच्या अपयशातून मिळालेल्या अनुभवाचा मोठा फायदा झाला. कुठे चुकले, कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या, यावर संशोधन आधीच झाले होते. त्यामुळे चांद्रयान-३च्या यशासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांवर थेट लक्ष केंद्रित करता आले.

याचा अर्थ असा होत नाही की सोमनाथ यांचे योगदान कमी होते, पण त्यांच्या हातात स्पष्ट दिशा होती. उलटपक्षी, सिवन यांनी मोठ्या अनिश्चिततेतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. एकदा अंधारात वाट चाचपडून रस्ता सापडला की, तोच रस्ता पुन्हा सरळ जाण्यास सोपा वाटतो. त्यामुळे खरा विजय केवळ अंतिम टप्पा पूर्ण करणाऱ्याचा नसतो, तर त्या दिशेने वाट दाखवणाऱ्याचाही असतो.

चांद्रयान-३च्या यशाने भारताची प्रतिष्ठा वाढली आणि नवीन शक्यता निर्माण झाल्या. मात्र, यशाच्या मूलभूत गाभ्याचा विचार करताना सिवन आणि त्यांच्या टीमचे योगदान विसरून चालणार नाही. ‘हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं’ हे या बाबतीत तंतोतंत लागू होतं; आणि म्हणूनच सिवन हे या प्रवासातील खऱ्या शिल्पकारांपैकी एक ठरतात.

error: Content is protected !!