चांगुलपणा आणि दुनियादारी!

गेल्या आठवड्यात सुट्टीच्या दिवशी माझ्या मुलीच्या आग्रहाखातर एका मॉल मध्ये गेलो होतो (तिथल्या एका स्टोअर मधून तिला क्राफ्टवर्क साठीच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून).

पार्किंगमधून वर गेल्यावर तळ मजल्यावरच एका सामाजसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांपैकी एका मुलीने विनंती करून बोलावून घेतले आणि स्वतःच्या संस्थेची ओळख करून दिली, काय काय ॲक्टिविटी करतात ते सांगितलं/त्यांच्या माहितीपत्रकात दाखवलं. तसेच तिने मला संस्थेनं दिलेलं तिचं ओळखपत्र दाखवलं आणि ती पीएचडी करत आहे असं सांगितलं. संस्थेचं नाव नवीनच होतं, अगोदर कधी न ऐकलेलं. अशा भरपूर फसव्या संस्था असतात हे ऐकिवात होतंच.

पण तरीही – आपण इकडं मॉल मध्ये फिरतोय, खरेदी करतोय, खातोय पितोय दुसरीकडे अशीही मंडळी आहेत जी बेसिक गरजांसाठी झगडत आहेत ही अपराधीपणाची भावना काहीतरी मदत केलीच पाहिजे म्हणून सांगत होती. त्यात टेबलावर लोकांची नावे आणि त्यांनी दिलेल्या देणग्या १५०० रू, २५०० रू इ. असा तपशिल लिहिलेला कागद ठेवला होता. अगदीच काही नाही तर शे पाचशे द्यावेत असा विचार येऊन शेवटी १००० रू ( २००० रू चे कुठले तरी पॅकेज होतं त्याच्या निम्मी रक्कम) UPI ने देऊन ज्यासाठी आलो होतो त्या खरेदीला निघालो. मला कसलीही पावती दिली गेली नाही. (नंतर माझ्या लक्षात आलं की हा सगळा प्रकार खूपच वेगाने, कोणीतरी मला हिप्नोटाइज करतंय की काय अशा पद्धतीने झाला).

स्टोअरमध्ये गेल्यावर मुलीला काय घेऊ आणि काय नको असं होत होतं – पण मी म्हणायचो, “हे खरंच तुला गरजेचं आहे का? नको; ठेव परत.” असं करत करत शेवटी फक्त ४०० रु मध्ये ४/५ फुटकळ वस्तू घेऊन स्टोअर मधून बाहेर पडलो. पण त्यातही ती खूष होती. तिला विचारलं, “पप्पांचा राग नाही येत का इतर ठिकाणी पैसे खर्च करतात आणि मला वस्तू परत ठेवायला सांगतात म्हणून?” तर ती म्हणाली, “त्या वस्तूंवाचून माझं काही अडणार नव्हतं पण ज्यांना खरंच एखादी गोष्ट गरजेची आहे त्यांना ती मिळाली तर चांगलंच आहे.” ऐकून बरं वाटलं.

पण मनात शंकेची पाल चुकचुकत होतीच – ही संस्था खरंच खात्रीची असेल का आणि सांगतात त्याप्रमाणे कामं करत असेल का? घरी आल्यावर नेटवर चेक केलं… त्यांची वेबसाईट होती. त्यावर फुटकळ माहिती, विदर्भ मराठवाड्यात कुठंतरी वह्या पुस्तके वाटल्याची वर्तमान पत्रातील कात्रणे असल्या काहीतरी थातूरमातुर गोष्टी होत्या. संस्थेने नेमकी काय ठोस कामं केलीत ह्याचं कुठे नामोनिशाण दिसत नव्हतं.

आणखी माहिती काढली असता कळलं की ती स्वयंसेवी संस्था नाहीच मुळी तर कंपनी कायदा २०१३ सेक्शन ८ प्रमाणे स्थापन केलेली एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ह्या अंतर्गत अशा कंपन्यांच्या नावापुढे foundation, forum, association, federation, chambers, confederation, council ह्यातलं काहीही एक लावता येतं आणि प्रा. लिमिटेड लिहिण्याची सक्ती नसते. अशा कंपन्यांची निर्मिती कला, वाणिज्य, विज्ञान, संशोधन, शिक्षण, क्रीडा, धर्मादाय, समाजकल्याण, धर्म, पर्यावरण संरक्षण किंवा इतर तत्सम उद्दिष्टे यांचा प्रसार करण्यासाठी केली जाते. ह्यांना नफा कमवता येत नाही आणि झालाच नफा तर तो डायरेक्टर मंडळींमध्ये न वाटता परत त्यांच्या कार्यात वापरावा लागतो. ह्यांना रीतसर CIN क्रमांक पण देण्यात येतो रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडून.

ते काही का असेना पण त्यांची एकूणच कार्यपद्धती मला दुसऱ्याची लहानगी लेकरं चोरून त्यांचा वापर भीक मागण्याचा धंदा करणाऱ्यांसारखी वाटली. ह्या असल्या कंपन्या कसला डोंबलाचा उदात्त हेतू ठेऊन समाजसेवा करत असतील आणि त्यांचा लेखाजोखा मांडणारे पण किती धुतल्या तांदळाचे असतील?

मनात फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली (पैसे गेले म्हणून नव्हे तर ते चुकीच्या हातांत गेले म्हणून). नेटवरूनच कंपनीच्या डायरेक्टर्स मंडळींची नावे शोधून काढली. त्यातल्या एकाला ईमेल करून – “तुमचे लोक स्वयंसेवी संस्था असल्याचं भासवून लोकांकडून पैसे गोळा करत आहेत. पण मी काढलेल्या माहितीनुसार तुम्ही तर एक खासगी कंपनी आहात. आणि कुठलीही सेवा न घेता मी तुम्हाला माझ्या कष्टाचे पैसे का देऊ? मला माझे पैसे परत करा.”

तिकडून उत्तर आलं, “तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही खासगी कंपनीच आहोत पण सेक्शन ८ प्रमाणे अशी कंपनी स्थापन करता येते (केलं ते बेकायदेशीर नाही ह्यावर भर!) आणि तुम्ही दिलेल्या रकमेचा योग्य विनियोग पण करत असतो आम्ही. तरीही तुम्हाला तुमचे पैसे परत हवे असतील तर ह्या ईमेलला ‘हो’ असे उत्तर पाठवा, तुमचे पैसे परत करतो.”

मी ‘हो’ म्हणून कळवलं. कबूल केल्याप्रमाणे दोन दिवसांनी त्यांनी माझा UPI address घेतला आणि पैसे परत केले. ह्यात त्यांचा काहीही मोठेपणा नव्हता तर ह्या बाबाचे पैसे परत नाही केले तर हा विनाकारण बोभाटा करेल आणि नको त्या गोष्टीसाठी आपली जाहिरात होईल सर्वत्र ही भीति! नंतर मुलीला झाला प्रकार आवर्जुन समजावून सांगितला.

सांगायचा मुद्दा हाच की तुम्ही जरी दयाभाव ठेऊन काही करू इच्छित असलात तरी तुमच्या ह्याच चांगुलपणाचा तुमच्याच विरुद्ध हत्यार म्हणून वापरणारे लोक पण आहेत ह्या जगात! तसेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवत असताना त्यांना दुनियादारीची ओळख करून देणं पण तितकंच महत्वाचं आहे.

error: Content is protected !!