उत्क्रांती-फसवेगिरी

आपल्याला वाटेल फसवेगिरी, लुच्चेगिरी, लबाडी फक्त माणूस प्राण्यातच आहे. थांबा, इतका टोकाचा विचार करू नका, हा प्रकार प्राणी (माणसासहित), पक्षी व वनस्पती जीवांच्यात सुद्धा आहे.

फरक इतकाच, प्राणी, पक्षी, वनस्पती पोट भरण्यासाठी किव्वा आपल्या प्रजातीची वाढ होण्यासाठीच या मार्गाचा अवलंब करतात. सर्वात महत्वाचे, ते स्वतःच्या जाती बांधवांना फसवत नाहीत जे मनुष्य प्राणी करतो.

“कोकीळ” पक्षी महाबेरकी, कुहुकुहू आवाज करत मानवाला आकर्षित करणारा पक्षी निसर्गाने का बनवला हे ही गुपितच आहे. या पक्षाला मातृप्रेम नाहीच, नाहीतर सांगा कोणत्या प्राणी-पक्ष्याच्या मादीला पिल्ले संगोपनाचे आकर्षण नसते? निसर्ग नेहेमी अपवाद देतोच, म्हणून तर म्हणतात “अपवाद, हा ही निसर्गाचा एक नियमच आहे”. आपल्या महाबेरकी कोकिलबाईचा अंडी घालण्याचा काळ, अगदी कावळीणीच्या बरोबरीने असतो. कावळी-कावळा जीवतोडुन मेहनत करून, काड्या जमवून उंच झाडावर ओबडधोबड का असेना घरटे बांधून, सुखी संसाराची सुरवात करतात. कवळीणीने अंडी द्यायला सुरुवात केली, की कोकिलबाई त्याच घरट्यात कावळे दांपत्य नसताना, हळूच जाऊन अंडे घालते, व पराकांदा होते. तिचे काम झाले! आता तिला काळजी नाही, पुढचे काम इमानेइतबारे कावळे दांपत्य करणार हे निश्चित झाले. कावळ्यांना आकडे मोजायला येत नाहीत, त्यामुळे कोकिलेचे फावते, अशिक्षित असण्याचा जग कसा फायदा घेते, त्याचे हे उत्तम उदाहरण. असो,

कावळी अंडी उबवते व अंड्यातून पिल्ले जन्माला येतात. निसर्गाने इथे कोकीळ पक्षाशी हातमिळवणी केलेली आहे, हे स्पष्ट दिसते. कोकीळ पिल्लू कावळ्यांच्या पिल्लापेक्षा आकाराने मोठे व ताकदवान असते हे निसर्गाने दिलेले वरदान आहे, त्याचा फायदा घेऊन, हे पिल्लू जास्तीतजास्त अन्न आईकडून ओढून घेते व जलदगतीने वाढते. यांचे कोकीळ खानदानच बेरकी, कोकीळ पिल्लू जरा मोठे झाले की, आई नसताना, कावळ्याच्या एकएक पिल्लाला जोरात लाथ मारून, ढकलून घरट्यातून खाली पाडून मारून टाकते. त्याचा हा उपद्व्याप भोळ्याभाबड्या आईला यत्किंचितही समजत नाही. आई बिचारी उरलेल्या पिल्लांना खाऊ घालत राहते, व जसजशी पिल्ले मोठी होत जातात, तसतसे त्यांची संख्या कमी कमी होत जाते. आता कोकीळ पिल्लू एकटेच असते, त्यामुळे त्याला भरपूर जेवण मिळते, त्याची वाढ झपाट्याने होते, आणि एक दिवस असा उजाडतो…. त्याच्या मुखातून काव काव आवाज येतच नाही, भलताच आवाज येऊ लागतो… इथे कावळा-कावळी संशयी होतात, पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते, आता त्यांना आपण पूर्ण फसलो याची खात्री होते, व त्याचा बदला घेण्यासाठी ते कोकीळ पिल्लाला मारायला जाणार, हे पिल्लू बरोबर ओळखते, व घरट्यातून धूम ठोकते. अशी ही बनवाबनवी…

काही प्रकारचे शिकारी पक्षी, मासे पकडण्यासाठी, माशांना आमिष दाखवतात, व पाण्यात तरंगणारी वस्तू टाकतात, मासे खायला आले की, झटकन त्या मासा पकडतात.

सिंहणी शिकार कळपाने करतात, एक दोघी माद्या सावज ठरवून त्याला समोरून भीती दाखवून स्तब्ध करतात, परंतू त्याच्यावर हल्ला करायला जात नाहीत. तो प्राणी सारखा त्यांच्याकडे पहात राहतो, या काळात त्यांच्यातील कुशल शिकारी तिसरी मादी, दबक्या पावलांनी लपत छपत ठरवलेल्या सावजाजवळ मागून जाऊन हल्ला करून त्याला धरून ठेवते, मग या दोघी वाघिणी समोरून त्याच्यावर हल्ला करून, सर्व मिळून त्याला ठार मारतात.

बाकी कोल्हा, लांडगा या प्राण्यांच्या लाबड कथा सर्वाना माहीत असतातच. कोल्ह्यांच्या लपण्याच्या जागेजवळ एखादा मोठा प्राणी गेल्यास, कोल्हा त्याची दिशाभूल करण्यासाठी, त्याला कोल्हा दिसेल अश्या त्याच्यापासून ठराविक अंतरावर उभा राहील, त्या प्राण्याला त्या कोल्ह्याचा पाठलाग करण्याची इच्छा होईल, हेच तर कोल्ह्याला हवे असते. कोल्हा पुढे पळतो, प्राणी त्याच्या मागे धावतो. त्याच्या घरापासून तो प्राणी दूर गेला असे कोल्ह्याला जाणवले की तो झुडपात गुडूप होऊन, लपतछपत घरी पोहोचतो. थोडक्यात, कोल्हा घाबरण्याचे नाटक करतो, व पळताना दोघांच्यात सामान्य अंतर राहील याची काळजी घेतो, तसेच चतुर कोल्हा त्या प्राण्याला दिसत राहील याची पुरेपूर दक्षता घेतो, ज्यामुळे तो प्राणी पाठलाग थांबवत नाही.

वाळवंटी प्रदेशातील काही वनस्पती मांसाहारी असतात, त्यांनी एक भांडे बनवलेले असते, त्यात किड्यांना आकर्षित करण्यासाठी माधासारखा पदार्थ भांड्याच्या तळाशी असतो. या भांड्याला वरती झाकण असते, किडा आत घुसला की वरून झाकण बंद होते. आत जो मध आहे, ते विष असते, आता ती वनस्पती किड्याला मारून खाऊन टाकते. अश्या प्रकारची अनेक वनस्पती आहेत, त्यांची किटक पकडण्याची क्लुप्ती साधारण एकाच प्रकारची असते.

समुद्रात खोलवर अनेक जलचर प्राणी आळशी असतात, पाठलाग करून शिकार करण्यापेक्षा, ते वाळूत लपून बसतात, किव्वा एखाद्या दगडाचा रंग घेऊन, व आकार करून बसतात, सावज टप्यात आले की बसल्या बसल्या त्याच्यावर झडप घालून खाऊन टाकतात.

अनेक प्राणी झाडात राहून हिरवा रंग घेऊन बसतात, त्यातून त्यांची शिकार होत नाही, तसेच ज्या प्राण्यांची शिकार करायची आहे त्यालाही हा प्राणी जवळ आहे हे समजत नाही. अनेक प्राणी असे, Camouflage करून आपला कार्यभाग निभावून नेतात.

काही वनस्पती दुसऱ्या जातीच्या वनस्पतीसारख्या भासतात, उदाहरण गाजरगवत (काँग्रेस गवत) हे गाजराच्या झाडासारखे भासते. नवख्या व्यक्तींना कळणारच नाही दोन्हीतील फरक. यातून त्यांचे फावते, व जगण्याची शक्यता वाढते.

सगळी दुनिया अशी ही बनवाबनवीने भरलेली आहे, आपण त्यात कुठे आहोत हे ज्याचे त्याने आकलन करावे. सामान्यपणे, आज जे प्राणी भूतलावर नांदत आहेत, त्यांनी वरील कोणत्या न कोणत्या क्लुप्तीचा वापर सतत सुरू ठेवलेला आहे, आणि येणाऱ्या भविष्यात त्यात भर पडणार आहे. अनेक वेळेस शिकार करायला जाणाराच शिकार होतो, हा पण निसर्गाने दाखवलेला चमत्कार असतो.

विजय लिमये (9326040204)

error: Content is protected !!