मोकळे व्हा! व्यक्त व्हा!

जर्मनीतील नाझींच्या छळछावणीतून वाचलेले आणि विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल यांनी सांगितलेला किस्सा …

व्हिक्टर यांना एकदा मध्यरात्री एका महिलेचा फोन आला आणि तिने सांगितले की, ती आत्महत्या करणार आहे. मग व्हिक्टर यांनी फोनवरच तिच्याशी जवळजवळ एक तास संवाद साधला. स्वतःचे समुपदेशनाचे कौशल्य वापरून तिला जगण्यासाठी प्रवृत्त केले, जगण्यासाठीचे उद्दिष्ट्ये, कारणे सांगितली. शेवटी तिने वचन दिले की, ती आपला जीव घेणार नाही आणि तिने वचन पाळले.
काही दिवसांनी जेव्हा ती महिला फ्रँकल यांना भेटली तेव्हा त्यांनी तीला विचारले की, “आपण फोनवर बोलल्यापैकी कोणत्या गोष्टीमुळे तुला जगण्याचे कारण मिळाले?”
तिने सांगितले, “त्यापैकी काहीच नाही”.

मग आत्महत्येपासून प्रवृत्त होऊन जगण्याचे असे कोणते कारण तिच्या बाबतीत घडले ?
तिचे उत्तर सोपे होते, “फ्रॅन्कल यांनी मध्यरात्री तिचे म्हणणे ऐकून घेण्याची जी इच्छा दर्शवली ती !”
तिच्या मनातील वेदना कोणीतरी समजून घेतली याने तिला खूप मोठा दिलासा मिळाला होता; तिच्या मनातील आशावाद जागृत झाला आणि तिला जगण्यासाठी प्रवृत्त केले.

बहुतेक वेळेला दुःखी व्यक्तीला त्याच्या मनातील ‘वेदना ऐकून घेणारा कान’ अन ते ‘समजून घेणारे अंतःकरण’ पाहिजे असते. मोठं मोठ्या तात्त्विक किंवा बौद्धिक युक्तिवादापेक्षा, दुसऱ्याचे दुःख ऐकण्याची छोटीशी कृती देखील खूप मोठा बदल घडवून आणू शकते.

आपण दुसऱ्यांसाठी करू शकत असलेली ही छोटीशी गोष्टही त्या व्यक्तीसाठी खूप मोठा आधार भेट नक्कीच ठरू शकते !

आत्महत्या ही इन्स्टंट प्रतिक्रिया नसते. हळू हळू मनातील अंधार दाटत जातो…. बरेच दिवस आत्महत्येचा विचार घोळत असतो आणि एक दिवस कोणतेच उत्तर सापडत नाही… कुणीच मदत करू शकत नाही, असे वाटते. पण या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी जर कुणी मदतीचा हात दिला तर नक्कीच ती व्यक्ती निराशा, दुःख झटकू शकते आणि परत आयुष्याला सुरुवात करू शकते. असे म्हणतात जर आत्महत्या केलेल्या व्यक्तीला जर उठवून विचारले की – “तू असे का केले?” तर ती व्यक्ती सुद्धा म्हणेल, “की तो माझा वेडेपणा होता!!”

म्हणूनच नैराश्य असेल, ताण तणाव असेल, तर जवळच्या, हक्काच्या, आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्ती बरोबर मनातली घालमेल व्यक्त झाली पाहिजे, मन मोकळे केले पाहिजे.

बऱ्याच वेळा ऐकणाऱ्याकडे त्या व्यक्तीच्या नैराश्यावर, अडचणींवर उपाय नसेल ही; पण आपण त्याची वेदना, दुःख समजून घेत आहोत, त्याला सहानुभूती दाखवत आहोत हे ही खूप महत्वाचे ठरते. आपले म्हणणे कोणीतरी ऐकून घेत आहे, याने त्या व्यक्तीच्या मनाला खूप मोठा दिलासा मिळतो; मन थोडेसे हलके होते आणि तो निराशा झटकून अडचणींवर मात करायच्या दृष्टीने पावलं टाकयला सुरूवात करतो.

एखाद्या मानसोपचाराची मदत ही घेता येऊ शकते. डॉ. व्हिक्टर यांना त्या महिलेने यासाठीच कॉल केला होता.

काही वेळेस, काही दुःखांसाठी फक्त थोडासा काळ निघून जाणे गरजेचे असते …. काळानुसार काही दुःखे आपोआप थोडीशी हलकी होतात.
आत्महत्येचा विचार करणारी, नैराश्यात असेलेली व्यक्ती कधी कधी त्या व्यक्तीच्या मनातील अस्वस्थता काही मार्गाने व्यक्त ही करत असते , तसे संकेतही देते.

जसे सुशांत सिग राजपूत ने ट्विटरची कव्हर इमेज म्हणून व्हिन्सेट व्हॅन गॉघ चे Starry Nights नावाचे पेटिंग ठेवले आहे. गॉघ यांनी हे पेटिंग १८८९ मध्ये काढले होते. यानंतर १८९० साली व्हिन्सेट गॉघ यांनी आत्महत्या केली. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु असताना गॉघ यांनी ते चित्र काढले होते. हा ही एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.

कदाचित आयुष्यात घडणाऱ्या घटना सर्व आपल्या हातात नसतील ही, पण त्याला आपण कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. त्यामुळे तो दृष्टीकोन बदलून आपण आपल्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो आणि स्वतः ला नैराश्यापासून वाचवू शकतो.
काही वर्षांपूर्वी दीपिका पदुकोण ही नैराश्या मध्ये गेली होती. पण घरच्यांच्या मदतीने आणि मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊन तिने त्यावर मात केली. ती यावर जाहीर व मोकळेपणाने बोलली पण आहे.

तंत्रज्ञानाच्या या युगात संपर्काची साधने वाढली आहे ..पण मनामनातील “संवाद” कुठेतरी हरवत चालला आहे ..तो परत सुरु करणे गरजेचे आहे. मना-मनातील संवाद परत सुरु झाला पाहिजे. मनातील नकारात्मक गोष्टींचा वेळोवेळी निचरा झाला पाहिजे.

यश-अपयश, हार-जीत या पेक्षा जगण्याला महत्व दिले पाहिजे . स्वतः वर प्रेम करायाला शिकले पाहिजे.

या साठी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून काही वेळ हा स्वतः साठी काढलाच पाहिजे. जगण्यातील आनंद शोधता आला पाहिजे.

असे म्हणतात छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात, कशासाठी जगायचे ते सांगतात. म्हणूनच एक तरी छंद असावाच जो तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायला लावेल, स्वतः ची लय शोधण्यास मदत करेल. स्वतः बरोबर इतरांनाही आनंद मिळेल.

ज्याप्रमाणे भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते. तसेच छंद म्हणजे आयुष्यातील गुलाबाचे फुलंच नाही का ?

छंद तुम्हाला आनंद तर देतातच शिवाय तुम्हाला सर्जनशील ही बनवतात .

सुशांत च्या ‘छिछोरे’ मधील डायलॉग प्रमाणे “हम हार जीत, सक्सेस फेलियोर में इतना उलझ गए हैं, कि जिंदगी जीना भूल गए हैं. जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इंपॉर्टेन्ट है तो वो है खुद की जिंदगी”

So …… Love You Zindagi !

~ अज्ञात लेखक

error: Content is protected !!