माकडाच्या हाती कोलीत

युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करून स्वतःच्या छंदाबद्दल माहिती शेअर करणाऱ्या आणि त्यातून अर्थार्जन करणाऱ्या लोकांची संख्या आज मोठी आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे — रेसिपी देणारे, फूड ब्लॉगर्स, ट्रॅव्हलर्स, विविध विषयांवर छान माहिती सांगणारे अनेक दर्जेदार क्रिएटर्स आज दिसतात. खरंच ‘डिजिटल डेमॉक्रसी’ची ही चांगली बाजू आहे.

पण याचबरोबर या प्लॅटफॉर्म्सवर सिरियस प्लेअर्सइतकेच हौशे-नवशे-गवशेही वाढले आहेत. ह्यांना कन्टेन्ट म्हणजे काय, त्याचा दर्जा, त्यातील बारकावे, प्रेक्षकांप्रती असलेली जबाबदारी, हे काहीही कळत नाही… कसलं कपाळाचं व्हॅल्यू क्रिएशन करणार ही मंडळी!

एकच ध्यास — “माझा चॅनल असला पाहिजे, मी फेमस झालो पाहिजे आणि मला त्यातून पैसे मिळायला हवेत.”

यांना नेमकं काय दाखवायचं हेच माहित नसल्यामुळे हे येरेगबाळे पर्सनल स्पेस, मर्यादा, गोपनीयता… सगळं धाब्यावर बसवून काहीही शेअर करायला लागतात. ह्या लोकांना जणू आपण एखादं “मिडिया हाऊस” चालवतोय असं वाटायला लागतं.

आणि मग संपूर्ण चित्र बघून ती म्हण आठवते…

माकडाच्या हाती कोलीत.

error: Content is protected !!