भारतीय राजकारणाची उत्क्रांती

भारतीय राजकारणात उत्क्रांती होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले, त्यांनी आपले नातलग विविध पदांवर ठेवून घराणेशाहीची पहिली मुहूर्तमेढ रोवली. पुढील सत्तर वर्ष गांधी घराण्याच्या रुपाने घराणेशाहीची किड देशाला पोखरत राहिली.

पुढे, याच धर्तीवर अनेक प्रादेशिक पक्ष उदयास आले आणि त्यांनी पण असाच, स्वतःच्या राज्यातून घराणेशाहीचा दिवा तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला, यातून एक समतोल निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आली. केंद्रातील गांधी घराणे देशावर राज्य करेल आणि राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष. जिथे प्रादेशिक पक्ष तग धरू शकत नव्हते तिथे, गांधी घराण्याशी इमान राखलेले काँग्रेसी आपल्या घराण्याची मक्तेदारी सांगत राज्यकर्ते बनून राहिले. एकंदरीत लोकशाही भारतात नावापुरतीच नांदली. थोडक्यात काय तर, पत्त्यांचा कॅट तोच, फक्त पाने आलटून पालटून वाटली जाई. पत्त्यांचा पूर्ण कॅट बदलण्याची खरी आवश्यकता होती. स्वातंत्र्यपूर्व काळात राजेशाही होती ज्यात राजाचा मुलगा राजा बनत होता, तोच कित्ता वेगळ्या रुपात घराणेशाही होऊन या लोकशाहीत दाखल झाला. जसे की same wine in new bottle.

याच कालखंडात जनसंघ जन्माला आला, या पक्षात घराणेशाही रुजली नाही, याचे प्रमुख कारण त्या पक्षात कोणी जाणारे नव्हतेच. जो त्या पक्षात जाईल, तो लष्कराच्या भाकऱ्या भाजतो अशी कुचेष्टा झाली. पुढे त्याच पक्षाने कोश रूपातून निघून, भारतीय जनता पक्ष हे नवीन नाव धारण केले. खऱ्या अर्थाने लोकशाही या पक्षात रुजली, वाढली व फोफावली. नाही म्हणायला दृष्ट लागू नये म्हणून जसे काळा टिळा लावतात, तसे या पक्षात अगदी खालच्या पातळीवर घराणेशाही पूर्वीही होती, व आजही आहे. फरक इतकाच ती मक्तेदारी म्हणून न राहता, कौशल्य, कसब, सामाजिक भान, काम करण्याची हातोटी, लोकमान्यता या गुणांचा कस लागेल त्यांनाच वडिलांची जागा देण्यात आली, ती सुद्धा एक मर्यादेपर्यंतच. आज भाजपने काँग्रेस पक्षाची देशात वाताहत केली आहे, याचे एकमेव कारण घराणेशाही आहे.

या समरात एकविसाव्या शतकात पुन्हा उत्क्रांती होऊन, आम् आदमी पार्टी नावाचा पक्ष उदयास आला. आज या पक्षाने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. कदाचित 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शड्डू ठोकल्यास नवल वाटायला नको. देशाचा जवळपास सर्व तरुण वर्ग भाजप व आम् आदमी पार्टी यांच्यात विभागला गेला आहे हे ताज्या निकालांवरून सुस्पष्ट झाले आहे. पुढे अशीच प्रगती सुरू राहिल्यास, आम् आदमी पार्टीचा पंतप्रधान देशाला लाभू शकतो.

आज देश बाहेरील असुरक्षतेपेक्षा आंतरिक असुरक्षतेने जास्त ग्रासलेला आहे. बेरोजगारी हे बुजगावणे आहे, ज्याचा वापर विरोधी पक्ष करतात, ते तितकेसे खरे नाही. ज्याला मेहनत करण्याची तयारी आहे, तो लाथ मारून पाणी काढतो, हे नवंनवीन उद्योजकांना पाहिले की समजते.

देशात आज तीन-चार प्रमुख मुद्दे आहेत. सर्वात महत्त्वाचं मुद्दा लोकसंख्या नियंत्रण हा आहे. नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून आज देशाची वाईट अवस्था झाली आहे हे नवीन पिढीला समजलेच पाहिजे. जो पक्ष लोकसंख्या नियंत्रणाचे यंत्र चालवेल तोच खरा देशभक्त म्हणायला हवा. शहरी भागात एक अपत्य, ग्रामीण भागात दोन, व आदिवासी बहुल क्षेत्रात तीन अपत्य मर्यादा आणणे आवश्यक आहे.

समान नागरी कायदा हा ज्वलंत विषय आहे, जिथे निधर्मी वा धर्मनिरपेक्ष राज्य मानायचे तिथे धर्मआधारित कायदे ठेवायचे हा विरोधाभास नाही का?

समाजात एकरूपता आणायची असल्यास, केवळ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गालाच सोयी द्यायला हव्या, तेही त्यांनी कुटुंब नियोजन केले असल्यास.

सर्वांना समान शिक्षण व्यवस्था ही केजरीवाल सरकारने आणलेली योजना अप्रतिम आहे, त्याचे अनुकरण देशव्यापी होणे जरुरी आहे. भाजपला त्याचा कित्ता गिरवण्यास कमीपणा वाटायला नको.

प्रत्येकाला वय वर्ष पंचवीस होण्याआधी देशासाठी एक वर्ष खर्ची करणे अनिवार्य असायला हवे. यासाठी विविध दालने उघडली गेली पाहिजेत, ज्यात प्रमुख सैन्य, पोलीस, व वैद्यकीय सेवा इथे सेवा करण्यावर भर द्यायला हवा, यातून राष्ट्रभक्ती व समाजसेवेची जाणीव आपोआप होईल.

देशाची तरुणाई तल्लख, हुशार, हरहुन्नरी आहे. देशाचे भविष्य उज्वल आहे.

विजय लिमये
(9326040204)

error: Content is protected !!