आत्मपरीक्षण : एक दुर्मिळ पण आवश्यक गुण

परवा एका समुपदेशक मित्राशी बोलताना सहज विचारलं की “कुठल्या लोकांचं समुपदेशन करणं सर्वात अवघड असतं?” त्यानं क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं – “आत्मपरीक्षण न करणाऱ्या लोकांचं.”

हे उत्तर ऐकल्यावर बराच वेळ विचार करत राहिलो.

या जगात कधीही चूक न करणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे. प्रत्येकजण कधी ना कधी चुकतोच. मतभेद असोत किंवा वादविवाद. अनेकदा चूक एका बाजूची असते तर कधी दोन्ही बाजूंनी काही ना काही त्रुटी झालेल्या असतात. अशा वेळी सत्याच्या जवळ नेणारं सर्वात प्रभावी साधन म्हणजे आत्मपरीक्षण.

आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांकडे आणि कृतींकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी. “या प्रसंगात माझा वाटा काय होता?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वृत्ती. म्हणूनच आत्मपरीक्षण करणारी व्यक्ती सहसा अनावश्यक वादात पडत नाही. कारण ती इतरांवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःकडे पाहण्याची सवय जोपासते.

परंतु प्रत्येकालाच आत्मपरीक्षण जमतं असं नाही.

इगो, हव्यास, न्यूनगंड, मत्सर आणि असुरक्षिततेची भावना यांसारख्या गोष्टींचा पगडा असणारी माणसं सहसा आत्मपरीक्षण टाळतात. कारण आत्मपरीक्षणासाठी स्वतःबद्दलचं एखादं अप्रिय सत्य स्वीकारण्याचं धैर्य लागतं. अहंकारी व्यक्तीला स्वतःची चूक मान्य करणं पराभवासारखं वाटतं. न्यूनगंड असलेली व्यक्ती स्वतःच्या उणिवांना सामोरं जाण्यापेक्षा त्यांच्यापासून दूर पळणं पसंत करते. मत्सराने ग्रासलेली व्यक्ती सतत इतरांकडे पाहत असल्याने स्वतःच्या अंतरंगाकडे पाहायला विसरते. तर असुरक्षित व्यक्तीला आत्मपरीक्षणातून उघड होणाऱ्या सत्याची भीती वाटते.

म्हणूनच अनेकदा अशी माणसं स्वतःच्या चुकांचा शोध घेण्याऐवजी परिस्थितीला, नशिबाला किंवा इतरांना दोष देण्यातच आयुष्य घालवतात.

खरं तर आत्मपरीक्षणाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसून अहंकार असतो. कारण अज्ञान शिकून दूर करता येतं. पण स्वतःविषयीच्या सोयीस्कर भ्रमांना चिकटून राहण्याची सवय माणसाला सत्यापासून दूर नेत राहते.

आत्मपरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला मात्र एक मोठा फायदा मिळतो. त्याला स्वतःच्या चुका दिसतात. त्या सुधारण्याची संधी मिळते. अनुभवातून शिकता येतं. त्याची परिपक्वता वाढते. नातेसंबंध अधिक सुदृढ होतात. स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलची समज अधिक स्पष्ट होत जाते.

पण आत्मपरीक्षणाची एक किंमतही असते.

कधी कधी एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करते. स्वतःच्या प्रत्येक कृतीचा विचार करते. आपल्या चुकीचा शोध घेते. पण शेवटी तिला जाणवतं की या प्रसंगात तिची चूक नव्हतीच. समस्या दुसऱ्या बाजूला होती. तरीही समोरची व्यक्ती स्वतःची जबाबदारी स्वीकारायला तयार नसते. चूक मान्य करणं तर दूरच राहिलं. उलट दोषारोप सुरूच राहतात.

अशा वेळी आत्मपरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला होणारी वेदना इतरांपेक्षा अधिक असते.

कारण तिनं स्वतःच्या मनाचा कठोर न्याय केलेला असतो. सत्य शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असतो. तिला वास्तव स्पष्टपणे दिसत असतं. पण समोरची व्यक्ती मात्र इगो, असुरक्षितता किंवा पूर्वग्रहांमुळे ते वास्तव स्वीकारायला तयार नसते. त्यामुळे संघर्ष केवळ मतांचा राहत नाही तर न्यायबुद्धीवरही घाव घालतो.

ज्याला आत्मपरीक्षणाची सवय नसते तो सहजपणे स्वतःला बरोबर समजून पुढे जातो. पण आत्मपरीक्षण करणारा माणूस प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतो. म्हणूनच त्याच्या जखमाही अनेकदा खोल असतात.

तरीदेखील आत्मपरीक्षणाची सवय सोडणं सयुक्तिक ठरत नाही. कारण आत्मपरीक्षणाचा उद्देश प्रत्येक वेळी स्वतःला दोषी ठरवणं नसतो. त्याचा उद्देश सत्य शोधणं असतो. कधी ते सत्य आपली चूक दाखवतं आणि कधी आपलं निरपराधित्व.

ज्या दिवशी माणूस स्वतःच्या चुकांकडे न घाबरता पाहू लागतो त्या दिवशी त्याची खरी वाढ सुरू होते. कारण आत्मपरीक्षण हे आत्मनिंदेसाठी नसतं तर आत्मविकासासाठी असतं.

परिपक्वता म्हणजे प्रत्येक वेळी चूक स्वतःवर घेणं नव्हे. परिपक्वता म्हणजे स्वतःची चूक असेल तर ती मान्य करणं आणि नसेल तर समोरच्याच्या नकारामुळे निर्माण होणारी वेदना स्वीकारूनही सत्याशी प्रामाणिक राहणं.

आत्मपरीक्षण हा केवळ एक गुण नाही. ती स्वतःशी प्रामाणिक राहण्याची तयारी आहे. आणि कदाचित म्हणूनच जगात आत्मपरीक्षण करणारी माणसं कमी आहेत; पण त्यांच्या अस्तित्वामुळे जो विवेक, समतोल आणि न्याय टिकून राहतो, त्याची किंमत मात्र अमूल्य आहे.

error: Content is protected !!