आधुनिक जगातील शिष्टाचार

1. छोटी दुकाने, विशेषत: QSR मध्ये QR कोड च्या समोर विनाकारण उभं राहू नये. स्कॅन करून लगेच बाजूला व्हावं.

2. मॉल मध्ये जाल तेव्हा पार्किंगसाठी 20 किंवा 50 रुपयांच्या सुट्ट्या नोटा जवळ ठेवा. कारण तुम्ही वापरत असलेलं UPI ॲप, त्याचं अपडेट, तळमजल्यातील पार्किंगमधील कमकुवत मोबाईल नेटवर्क किंवा बँकेचा सर्व्हर — यापैकी कुठलीही गोष्ट वेळेवर साथ देईलच याची खात्री नसते. उगाच तुमचाही वेळ जातो आणि मागच्यांचाही खोळंबा होतो.

3. रेस्टॉरंटमध्ये वॉश बेसिनमध्ये हात धुऊन लगेच तेथून काढता पाय घ्यावा. लग्न कार्यालयांसारखी नळांची मोठी रांग नसल्याने मागे लोक थांबून राहतात.

4. तुम्ही सायकलवरून स्कूटरवर, स्कूटरवरून कारमध्ये पोहचलात तरी रस्त्याकडच्या टपऱ्यांवर आणि ठेल्यांवर खरेदी करायची जुनी सवय मोडली नाहीत… हरकत नाही. अहो पण कार पार्क करताना इतरांना अडथळा होणार नाही एवढी काळजी तरी घेत जा.

5. संगीताची आवड असणं वाईट नाही. पण सार्वजनिक ठिकाणी तुमची अभिरुची इतरांच्या माथी मारू नका. इअरफोन वापरा.

6. लिफ्टमध्ये शिरताना आधी आतले लोक बाहेर येऊ द्यावेत मग आपला मोर्चा वळवावा.

7. मोबाईलवर मोठ्याने स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी बोलणं टाळावं.

8. रांगेत उभं राहणं हा कमीपणा नसून सभ्यतेचा भाग आहे.

9. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीचं चित्रीकरण टाकण्यापेक्षा काही क्षण प्रत्यक्ष जगावेत.

10. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून स्वच्छतेवर भाषण देऊ नये.

11. ऑनलाइन असणं म्हणजे लगेच उत्तर देण्याची जबाबदारी असतेच असं नाही हे समजून घ्यावं.

12. वाहन चालवताना हाय बीम हा अधिकार नसून जबाबदारीचा विषय आहे.

13. सार्वजनिक ठिकाणी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागणं तुमचा दर्जा वाढवत नाही.

14. एस्कलेटरवर जराही पुढं न सरकता पाय रोऊन उभं राहायचं असल्यास एका बाजूला उभं राहावं जेणेकरून घाईतील लोकांना मार्ग मिळेल.

15. कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये तासन्तास एकच टेबल अडवून बसणं इतर ग्राहकांवर अन्याय ठरू शकतो.

16. प्रत्येक गोष्टीवर मत असणं आवश्यक नाही. काही ठिकाणी शांत राहणं हाही शिष्टाचार असतो.



error: Content is protected !!