
१५ सप्टेंबर १८३०… इंग्लंडमध्ये लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर या शहरादरम्यान जगातली पहिली इंटरसिटी रेल्वे धावली. तो औद्योगिक क्रांतीचा काळ होता. मॅन्चेस्टर मध्ये सगळ्या कापड गिरण्या होत्या. अख्ख्या जगाला पुरेल एवढं कापड तिथे तयार होत होतं. यासाठी लागणारा कच्चा माल- कापूस भारत, अमेरिकेतून लिव्हरपूलच्या बंदरावर यायचा आणि मग तिथून मॅन्चेस्टरला रवाना व्हायचा. म्हणून लंडनच्या आधी तिथे पहिली वाफेच्या इंजिनवर धावणारी रेल्वे सेवा सुरु झाली. या रेल्वेमुळे मॅन्चेस्टरची प्रगती दुप्पट वेगाने होऊ लागली.
उद्योगधंदे वाढवायचे असतील तर वाहतूक व्यवस्था चांगली करावी लागणार हे निश्चित होतं.
लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर दरम्यान वेळापत्रका नुसार रेल्वे धावतेय, शेकडो लोक या गावाहून त्या गावी सुखकर प्रवास करताहेत, कच्चा माल निर्धोकपणे कारखान्यांमध्ये पोहचतोय हे सगळं त्याकाळचं नवल होतं. ही बातमी सगळीकडे पसरली.
मुंबईमधील एका माणसाला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटलं. आपल्या गावात सुद्धा रेल्वे धावली पाहिजे असं त्याला वाटू लागलं. अजून अमेरिकेत रेल्वे उभी राहात होती आणि हा भारतासारख्या गरीब आणि ब्रिटीशांच्या ताब्यात असलेल्या देशात राहणारा माणूस रेल्वेची स्वप्नं बघत होता. दुसरं कोणी असतं तर लोकांनी खुळ्यात काढलं असतं. पण ही असामी कोणी साधीसुधी नव्हती. ते होते.. खुद्द ईस्ट इंडिया कंपनीला कर्ज देणारे मुंबईचे सावकार व आधुनिक मुंबईच्या विकासाचे आद्य शिल्पकार.. नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ !
नाना शंकरशेठ यांचं खरं नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे. त्यांचे मूळगाव मुरबाड. घराणे पिढीजात श्रीमंत ! त्यांचे वडील इंग्रजांना कर्जे देणारे मोठे सावकार ! इंग्रज टिपू सुलतान युद्धात त्यांनी बराच पैसा कमवलेला. त्यांचाच एकुलता एक मुलगा म्हणजे नाना. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलं हे बाळ. पण फक्त लक्ष्मीच नाही तर सरस्वतीचाही आशीर्वादाचा हात डोक्यावर होता. वडिलांनीही स्पेशल शिक्षक लावून इंग्लिश वगैरे मध्ये पोराला तयार केलं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर घरचा उद्योगधंदा त्यांनी आणखी मोठा केला. सगळं जग इंग्रजांपुढे माना झुकवून उभ राहायचं तेव्हा नाना शंकरशेठ यांची कृपा व्हावी यासाठी इंग्रज अधिकारी नाक घासत असत..!
एकदा एका पार्टीमध्ये नानांची ओळख मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लाॕर्ड स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन शी झाली. दोघे चांगले मित्र बनले. एल्फिन्स्टनला भारतीयांबद्दल सहानुभूती होती. इथली गरिबी मिटावी, देश आधुनिक जगाशी जोडला जावा यासाठी तो प्रयत्नशील होता.
नानांना सुद्धा आपल्या बांधवांचा अडाणीपणा दूर व्हावा, आपल्या गावाची प्रगती व्हावी असे वाटत होते.
मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईमधली पहिली मुलींची शाळा अशा अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी वरील संस्था तर उभारल्याच, त्याशिवाय मुंबईत अनेक रस्ते उभारले, दवाखाने सुरु केले, भारतातली पहिली जहाज कंपनी सुरु केली.
सात बेटांच्या गावाला ‘मुंबई शहर’ बनवण्यात नाना शंकरशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे हे इंग्रजही कधी नाकारु शकणार नाहीत.
तर अशा या नाना शंकरशेठ यांच्या मनात आलं की मुंबईत रेल्वे सुरु करायची. साल होतं १८४३. तेव्हा त्यांच्या वडिलांचे मित्र सर जमशेठजी जीजीभाॕय उर्फ जेजे यांच्याकडे ते गेले. नानांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर नानांसाठी ते वडीलांसमानच होते. त्यांना नानांनी आपली कल्पना सांगितली. त्यांनाही ही कल्पना पटली. मुंबईत रेल्वे सुरु होऊ शकते का याबद्दल त्यांनी इंग्लंडहून आलेले सुप्रीम कोर्टाचे जज सर थॉमस एरस्कीन पेरी यांचं मत घेतलं. ते सुद्धा या कल्पनेने खुश झाले. या तिघांनी मिळून इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली.
तेव्हा कंपनी सरकारच्या जरासुद्धा मनात नव्हतं की भारतात रेल्वे सुरू व्हावी. पण नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पेरी असे लोक पाठी लागलेत म्हटल्यावर त्यांना यामध्ये लक्ष घालावेच लागले. १३ जुलै १८४४ रोजी कंपनीने इंग्लंड सरकारला प्रस्ताव सादर केला. मुंबईपासून कुठपर्यंत रेल्वे लाइन टाकता येऊ शकते, याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर ‘बॉम्बे कमिटी’ स्थापन करण्यात आली.
नानांनी आणखी काही मोठी व्यापारी मंडळी, ब्रिटीश अधिकारी, बँकर्स यांना एकत्र करून ‘ग्रेट इंडियन रेल्वेची’ स्थापना केली. याच काळात इंग्लंडमधल्या भांडवलदारांना भारतात मुंबईमध्ये रेल्वे सुरु करण्यासाठी चालू असलेल्या हालचालींची कुणकुण लागली. लगोलग लॉर्ड जे. स्टुअर्ट वॉर्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वेची’ स्थापना केली. या कंपनीचं मुंबईमध्ये देखील ऑफिस उघडण्यात आलं.
नानांच्या बंगल्यात कंपनीचं कार्यालय सुरु करण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडहून आलेले तज्ञ इंजिनियर रेल्वेमार्ग उभारणीचं काम करु लागले. फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण आशिया खंडात प्रथमच रेल्वे धावणार होती. अखेर तो दिवस उजाडला.. १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता मुंबईच्या बोरिबंदरहून ठाण्यासाठी पहिली ट्रेन निघाली. या ट्रेनला १८ कंपार्टमेंट आणि तीन लोकोमोटिव्ह इंजिन्स होती. पहिल्या प्रवासासाठी खास फुलांनी शृंगारलेल्या या ट्रेनच्या प्रवाशांमध्ये नाना शंकरशेट व जमशेटजी जिजीभाॕय देखील होते.
रेल्वे स्थानकासाठी नानांनी बोरीबंदर येथील त्यांची मोठी जमीन सरकारला मोफत दिली. जिथे आज भव्य रेल्वे टर्मिनस उभे आहे. सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याचे श्रेय देतात. पण नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाबद्दल, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नाही.
आज भारतीय रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यापैकी एक आहे. रेल्वेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. आज मुंबई मेट्रोसिटी आहे, उद्योगनगरी म्हणून जगभरात ओळखली जाते, यामागे ‘मुंबईच्या विकासाचे आद्य शिल्पकार’ असलेल्या नाना शंकरशेठ या एका मराठी माणसानं पाहिलेलं अशक्यप्राय स्वप्न आहे.
कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नसणारी ही माणसे असे काही महान कार्य करुन जातात तेव्हा आपणही त्यांच्या चरणी आपोआप नतमस्तक होऊन जातो..!
~ लेखक अज्ञात


