आपण सगळे परिणामांच्या मागे सतत धावत असतो. परीक्षेत चांगले मार्क्स, चांगली नोकरी, स्पर्धेत विजय, वाढलेलं वजन कमी होणं – हेच आपल्याला हवं असतं. हे सगळं आऊटकम आहे.
पण प्रश्न असा आहे – या आऊटकम पर्यंत पोहोचण्यासाठी आपण तयार आहोत का त्या प्रवासाला सामोरं जायला, ज्याला प्रोसेस म्हणतात?
प्रोसेस म्हणजे काय?
प्रोसेस म्हणजे दररोजचा अभ्यास, घाम गाळून केलेला सराव, सातत्याने पाळलेली शिस्त, झालेल्या चुकांतून सतत शिकत जाणं, अपयश पचवून पुन्हा उभं राहणं. आणि हाच तो भाग आहे ज्यापासून बहुतेक जण पळ काढतात.
आऊटकम एक क्षण, तर प्रोसेस एक प्रवास आहे. आऊटकम मिळाल्यावर काही क्षणांचा आनंद मिळतो. प्रोसेस पाळताना प्रत्येक टप्प्यावर शिकायला मिळतं, घडायला मिळतं.
आऊटकम सर्वस्वी आपल्या हातात नसतो – बाहेरचे घटक परिणाम करतात. प्रोसेस मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते – किती मेहनत घ्यायची, किती सातत्य ठेवायचं हे आपणच ठरवतो.
प्रोसेस हा प्रवास आहे ज्यातून आऊटकम आपोआप जन्मतो. जगात कोणालाही प्रोसेस टाळता आलेली नाही.
कुणीही असो – विद्यार्थी, खेळाडू, व्यावसायिक… अगदी चुकीचा मार्ग निवडणाऱ्यांनाही प्रोसेस पाळावीच लागते. चोरी करायची ठरवली तरी आधी तयारी, प्लॅन, जोखीम समजून घेणं – ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात.
म्हणूनच प्रोसेस हा निसर्गाचा नियम आहे – तो टाळता येत नाही.
खरा फोकस कुठे असावा?
जग आऊटकम कडे बघतं. लोक तुमचं कौतुक तेव्हाच करतील, जेव्हा तुम्ही जिंकाल, यशस्वी व्हाल. पण आऊटकम क्षणभंगुर आहे. तुम्हाला घडवणारं, मजबूत करणारं, खऱ्या अर्थानं बदलणारं जर काही असेल तर ती प्रोसेस आहे.
आऊटकम मिळाला नाही तरी हरकत नाही, पण प्रोसेस टाळलीत तर स्वतःलाच हरवलंत.
शेवटचा विचार
यश मिळालं नाही तर काही हरकत नाही – पण जर तुम्ही प्रोसेस प्रामाणिकपणे पाळलीत, तर तुम्ही हरलात तरी जिंकलातच. कारण आऊटकम मिळालं नाही तरी तुमची प्रवासातील प्रगती, तुमचं शिस्तबद्ध होणं, तुमचं वाढत राहणं – हे कुणी हिरावून घेऊ शकत नाही.
आऊटकम हे ध्येय आहे तर प्रोसेस हा प्रवास. ध्येयापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहेच, पण खरं तर त्या ध्येयाकडे नेणारा प्रवास हेच खरं माणसाचं आयुष्य असतं.
सर्वात महत्वाचा प्रश्न:
जर आऊटकम हा प्रोसेस वर अवलंबून असेल आणि प्रोसेस पूर्णपणे आपल्या हातात असेल – तर आऊटकमची जबाबदारी कोणाकडे उरते?
उत्तर सोपं आहे – प्रोसेसवर प्रामाणिक राहणाऱ्या (किंवा न राहणाऱ्या) कडेच!


