समस्या: छोटी की मोठी?

“तुला एवढ्याशा गोष्टीचं टेन्शन का आहे?”, “हा काय प्रॉब्लेम आहे का?” अशा प्रतिक्रिया आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून अनेकदा ऐकायला मिळतात. काही वेळा हे बोलणं सहजपणे येतं, पण त्या व्यक्तीसाठी त्या क्षणी तो त्रास खरा आणि मोठा असतो. खरं तर, एखादी गोष्ट मोठी की छोटी आहे हे त्या गोष्टीच्या स्वरूपावर नाही, तर ज्याच्या आयुष्यात ती घडते आहे त्याच्या अनुभवांवर आणि मानसिकतेवर अवलंबून असतं.

समजा दोन मित्र एकाच कंपनीत काम करतात. एका दिवशी एकाचा लॅपटॉप अचानक बंद पडतो आणि महत्वाची प्रेझेंटेशन फाईल उघडत नाही. त्याचा चेहरा उतरतो, तो गोंधळतो, चिडतो. दुसरा मित्र मात्र म्हणतो, “अरे, काही नाही. दुसऱ्या मशीनवर बस आणि परत तयार कर.” पण त्या पहिल्या मित्रासाठी ती वेळ महत्वाची असते. तो गेल्या काही दिवसांपासून झपाटून काम करत असतो, प्रेझेंटेशनवर त्याची पदोन्नती अवलंबून असते आणि हे यश त्याच्या घरच्यांसाठी स्वप्नपूर्तीचं साधन ठरणार असतं. त्या क्षणी त्याचं मशीन बंद पडणं त्याच्यासाठी फक्त टेक्निकल अडचण नव्हे, तर एक धक्का असतो.

दुसरं उदाहरण एका आजीचं. त्यांचा एकुलता एक नातू पहिल्यांदा परदेशात जातो आणि त्यांच्याशी दररोज व्हिडीओ कॉल करत असे. एक दिवस अचानक त्याचा फोन बंद येतो. आजींना काहीच कळत नाही. त्या बेचैन होतात, काही बिघडलंय का, हे विचार करत झोपेचा खोळंबा होतो. आजूबाजची मंडळी म्हणतात, “अहो, फोन नाही तर नाही. उद्या करेल.” पण त्या आजींसाठी नातवाचा कॉल म्हणजे नातवाचं अस्तित्व, जिव्हाळा आणि त्यांच्या दिवसाचं एकमेव आश्रयस्थान असतं.

या दोन्ही उदाहरणांतून दिसतं की परिस्थितीपेक्षा भावनिक गुंतवणूक हेच त्या समस्येचं गांभीर्य ठरवतं. जी गोष्ट बाहेरून क्षुल्लक वाटते, ती आतून फार मोठी असते. एखाद्याच्या डोळ्यांत अश्रू असतात, कारण त्याच्या अंतर्मनात खूप काही कोसळलेलं असतं. हे कोसळणं आपण पाहू शकत नाही, पण त्याची जाणीव ठेवणं — हीच खरी माणुसकी आहे.

समस्या म्हणजे केवळ बाह्य घटना नाहीत; त्या मनाच्या हालचाली आहेत. एखाद्याचा चेहरा हसरा असतो, पण आतून तो खचलेला असतो. कुणी सांगत नाही, पण त्याला फक्त कोणी ऐकावं, समजून घ्यावं, एवढंच हवं असतं. म्हणूनच, एखाद्याचा त्रास पाहून त्याकडे तुलनात्मकपणे पाहण्यापेक्षा, त्या क्षणाला त्याच्या नजरेतून पाहणं — हीच खरी साथ ठरते.

समस्या लहान की मोठी — हा मुद्दा नसतोच मुळी. कारण कोणाचं दु:ख मोजता येत नाही. प्रत्येकाच्या वेदनेला ज्याचं त्याचं महत्त्व असतं. आपल्या जगण्यात जर आपल्याला कुणाच्या डोळ्यांतील गोंधळ समजत असेल, कुणाच्या शांतते मागची खळबळ वाचता येत असेल, तर आपण खऱ्या अर्थाने ‘मानव’ झालो असं म्हणता येईल.

error: Content is protected !!