आयुष्यात मोठ्या ध्येयांचा पाठपुरावा करताना अनेक गुण आवश्यक ठरतात, पण त्यातील एक विशेषतः महत्त्वाचा गुण म्हणजे आनंदाचा उपभोग लांबणीवर टाकण्याची क्षमता (ability to postpone gratification). याला संयम किंवा मोहावर नियंत्रण असं म्हणता येईल.
मार्शमॅलो प्रयोग आणि संयमाचे महत्त्व
1970 च्या दशकात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी या गुणाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक प्रसिद्ध प्रयोग केला, जो मार्शमॅलो प्रयोग म्हणून ओळखला जातो.
प्रयोगाची रचना:
मुलांना एका खोलीत एकटे ठेवून त्यांना एक चॉकलेट दिले गेले आणि सांगण्यात आले की, “जर तुम्ही हे चॉकलेट लगेच खाल्ले नाही, तर पंधरा मिनिटांनी तुम्हाला दुसरे चॉकलेट दिले जाईल.” काही मुलांनी संयम दाखवला, तर काहींनी मोहावर नियंत्रण ठेवण्यात अपयश पत्करले.
निष्कर्ष:
ज्या मुलांनी संयम दाखवला, त्यांनी प्रौढ वयात शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक, आणि सामाजिक यश मिळवले. त्यांच्या नातेसंबंधांमध्ये स्थैर्य होते, तर संयम न राखणाऱ्या मुलांच्या प्रगतीवर मर्यादा दिसून आल्या.
संयमाचा मेंदूशी संबंध
या संयमाचा उगम मेंदूतील प्रिफ्रंटल कोर्टेक्समध्ये होतो, जो निर्णयक्षमता, दूरदृष्टी, आणि आवेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार आहे. हा भाग साधारणतः वयाच्या २५व्या वर्षांपर्यंत विकसित होतो. त्यामुळे लहानपणात मिळालेलं योग्य मार्गदर्शन आणि चांगलं वातावरण संयम विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
प्रलोभनांवर मात करण्याचं महत्त्व
आपल्या रोजच्या जीवनात अनेक प्रलोभनं असतात: अभ्यास करताना सोशल मीडिया किंवा पार्टीचा मोह, आरोग्य राखताना जंक फूड खाण्याची इच्छा, व्यावसायिक जीवनात लवकर यश मिळवण्यासाठी शॉर्टकट घेण्याचा मोह. अशा वेळी प्रलोभनांना टाळण्यासाठी इच्छाशक्ती आणि संयमाची साथ लागते. संयम म्हणजे आपल्या मोठ्या ध्येयासाठी लहान फायद्यांचा त्याग करणं.
जडणघडण आणि इच्छाशक्ती
संयम फक्त आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून नसून त्यामागे आपली जनुकीय जडणघडण, बालपणीचं पालनपोषण, आणि आजूबाजूचं वातावरण महत्त्वाचं ठरतं. बालपणात अनुभवलेल्या घटना किंवा मानसिक आघात देखील मेंदूच्या प्रिफ्रंटल कोर्टेक्सच्या विकासावर प्रभाव टाकू शकतात.
उपसंहार
आनंदाचा उपभोग लांबणीवर टाकण्याची क्षमता म्हणजेच संयम आपल्या यशाचं गमक ठरू शकतं. हा गुण फक्त शारीरिक किंवा मानसिकच नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वच पैलूंवर परिणाम करतो. त्यामुळे हा गुण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे.
~ राहुल करुरकर


