२५ वर्षं विविध व्यवसायात गुंतवणूक आणि देखरेख करूनही, मी आणि चार्ली मंगर कठीण व्यवसायिक समस्या सोडवायला शिकलो नाही. पण त्या टाळायला मात्र नक्की शिकलो. आमच्या यशाचं गुपित सात फूट उंच अडथळे पार करण्यात नाही, तर एक फूट उंच अडथळे ओळखून सहज पार करण्यात आहे.
~ वॉरेन बफे
एके काळी जगातील क्रमांक एकची श्रीमंती भूषवलेल्या (आणि आजही अव्वल सातमधील) वॉरेन बफे यांसारख्या दिग्गज व्यक्तीने स्वतःच कबूल केलं आहे की त्यांनी आणि चार्ली मंगर (त्यांचे सहकारी) यांनी कधीही अवघड व्यवसायिक समस्यांचं समाधान शोधलं नाही—ते फक्त त्या टाळत गेले. मग आपणच का मोठ्या अडथळ्यांवर मात करण्याचा अट्टहास धरावा?
आधुनिक काळात, यश म्हणजे निरंतर धावण्याचं प्रतीक बनलं आहे. मोठ्या अडथळ्यांवर विजय मिळवणं हे महानतेचं सूचक मानलं जातं. पण बफे-मंगर जोडीचा दृष्टिकोन याला आव्हान देतो. त्यांचं म्हणणं असं आहे की यश सात फूट उंच भिंतीवर चढण्यात नाही, तर समोर आलेले एक फूट उंच अडथळे वेळीच ओळखून त्यांना सहज पार करण्यात आहे.
ही दृष्टी साधेपणातलं खरं शहाणपण दाखवते. जीवन आणि व्यवसायात टिकाऊ समृद्धी ही संघर्षाच्या तीव्रतेवर नव्हे, तर सोप्या, पण अचूक निर्णयांवर उभी असते.
मग प्रश्न असा आहे—समस्या मोठ्या आणि गंभीर होईपर्यंत थांबायचं का, की त्या उद्भवण्यापूर्वीच चाणाक्षपणे हेरून योग्य उपाययोजना करून पुढच्या समस्यांना टाळायचं आणि वाचलेली ऊर्जा एखाद्या सकारात्मक कामात गुंतवायची?
लहानसा ढग ओळखून छत्री घेणं, याला शहाणपण म्हणतात; पाऊस कोसळल्यानंतर आश्रय शोधणं हे तात्पुरते उपाय आहेत! हुशारी संकटं सोडवण्यात नाही, तर ती उभी राहण्यापूर्वीच समजून घेण्यात आहे.
सोपं तत्त्व: जीवनातील मोठा विजय सात फूट उड्या मारण्यात नसतो, तर जे सहज पार करता येईल ते हुशारीने ओळखण्यात असतो!


