सोशल मीडियावरचे ठग

आठ दिवसापूर्वी फेसबूक सर्फिंग करत असताना अचानक आकर्षित करणारी जाहिरात समोर आली, त्यात सुरेख झुला दाखवण्यात आला ज्याची बाजारात साधारण किंमत रू 8000 पर्यंत आहे, परंतु या जाहिरातीमध्ये त्याची किंमत रु 1499 दाखवण्यात आली होती.

पुढे दोन तीन दिवस मी त्या जाहिरातीला दुर्लक्षित करत होतो, परंतु वारंवार ती डोळ्यासमोर येत असल्यामुळे आणि तसेही मी झुला खरेदी करणार आहे हे ठरवले असल्याने, मोह होऊन झुल्याचे रू 1499 मागचा पुढचा विचार न करता ऑनलाइन पेमेंटने देऊन टाकले.

लगोलग पैसे मिळाले आहेत, याचा कंपनीकडून एसएमएस आला. पुढे जवळपास पंधरा दिवस वाट पाहिली, झुला काही आला नाही, मग मी माझ्या थोरल्या लेकीला ही बाब सांगितली व एसएमएस दाखवला.

तिने कंपनीचे नाव गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला पण अशी कोणतीच कंपनी नव्हती हे पाहून, तिला माझी फसगत झालेली आहे हे पुरेपूर समजले.

माझ्याकडे एक वेडपट माणसाकडे कटाक्ष टाकतात तसा टाकून म्हणाली “काय हे बाबा तुम्ही फसले आहात”. आपल्याला पंधराशे रुपयांचा चुना लागला आहे, आपले पैसे डूबले आहेत, तुम्हाला कधीही झुला मिळणार नाही कारण अशा नावाची कोणतीच कंपनी नाही. मी मात्र तिच्या या उत्तराने चक्रावलो.

लेकीने पुढे सांगितले, अशा अनेक जाहिराती फेसबुक, ट्विटर वर दिसत असतात त्यातल्या 90% जाहिराती या फसव्या असतात आणि त्यातील दाखवलेल्या वस्तू आपल्याला कधी मिळणार नसतात म्हणून अशा जाहिरातींना कधीच भुलू नये.

या फसव्या जाहिराती कशा प्रकारच्या असतात त्याचे काही तर्क खाली देत आहे.

आपल्याला चित्रात दाखवण्यात येत असलेली वस्तू, बाजारात मिळणाऱ्या वस्तूच्या अर्ध्या किमतीत, किंवा 80 ते 90% डिस्काउंटवर, मिळत असल्यास समजावे नक्कीच इथे तुम्हाला गंडा घालायचा विचार आहे.

जी वस्तू आपल्याला किंमतीमुळे आकर्षित करत आहे, अश्या वस्तू विकणाऱ्या कंपनीचा मागोवा घ्या, त्यांची वेबसाईट आहे का पहा. त्यांचे फोन नंबर आहेत का? असल्यास ते सुरू आहेत का? त्यावर फोन केल्यावर आपल्याला सकारात्मक उत्तरे मिळतात का, हे तपासा. असे फोन एक तर बंद असतात, किंवा अस्तित्वात नसतात.

बहुतेक ठगबाज कंपन्या कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय देतच नाहीत. तिथे त्यांची ठळक अक्षरात नोंद असते की आत्ताच्या आत्ता पैसे भरले तरच हे इतक्या स्वस्त दरात मिळणार आहे, अशा तऱ्हेने आपल्याला “फिअर ऑफ मिसिंग आऊट” च्या मायाजाळात अडकवले जाते.

या ठगांना आपल्याला काय हवे आहे हे कसे समजते? तर आपण गुगलवर माहिती शोधत असतो, त्याचा त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून सुगावा लागतो, आणि मग ते लोक फेसबुकवर आपण सर्फिग करताना, मोहित करणाऱ्या वस्तू आपल्यासमोर दाखवतात.

यात ठग ओळखण्याची आणखी एक युक्ती सांगतो, हे लोक एक किंवा दोन वस्तू आपल्याला दाखवतात. चितपरिचित कंपन्यांच्या विविध वस्तू (प्रॉडक्ट्स) एकच वेळेस समोर येतात. तसेच जरी वस्तू पसंत पडली तरी त्या कंपनी बद्दलचे अभिप्राय जरूर पहावेत. ठगी कंपन्यांच्या बद्दल remark मध्ये fraud, spam वगैरे लिहिलेले दिसते.

ही चर्चा सौभग्यावतीस समजली. तिने मी किती बावळट आहे, याचा पाढा पुन्हा एकवार गायला, आणि माझी दुखरी नस, जोरात दाबली, तसेही तिला माझ्या जखमेवर मीठ चोळणे चांगलेच जमते. माझी पडती बाजू सांभाळण्याचा मी विफळ प्रयत्न केला, पण माझ्या शब्दांना आज धार नाही, हे सर्वांना माहीत झाले होते.

इतक्या सर्व गदारोळात, आमची धाकटी कन्या, काय गोंधळ सुरू आहे पाहण्यास आपला अभ्यास सोडून आली. तिलाही मी कसा फसलो याचे रसभरीत वर्णन बायकोने केले, यात तिची तीन विरुद्ध एक अशी सरशी होऊन विजय अगदी पक्का झाला आहे, असे वटताना, अचानक बाजी पालटली, व कन्या ताडकन बोलून गेली, आई तुझी पण तर फसगत झाली होती ना. ….

तू नाही का चार साड्या अश्याच मागवल्या होत्यास, त्या तरी कुठे आल्या? दोन हजारांची साडी तुला तीनशे रुपयांना मिळणार, म्हणून तू साड्या मागवल्या होत्या, आणि तुझे ही पैसे डूबलेच ना. ती ही बोलत असताना, बायको मात्र तिच्याकडे ओठ दातांनी चावत, मोठ्या डोळ्यांनी दटाऊन पहात असलेले मी पाहिले.

आता माझ्या शब्दांना धार आली….. पुढचे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही सुज्ञ आहात, समजून घेतले असेलच. असो…

बहुतेक वेळेस नुकसान पाचशे, हजार रुपयांचे असते म्हणून आपण फारसे मनाला लाऊन न घेता, बाब सोडून देतो. ठगबज लोकांना तेच हवे असते. आपण इतक्या छोट्या रकमेसाठी सायबर गुन्हे शाखेत जाणार नाही याची या ठगांना पुरेपूर माहिती असते, म्हणून त्यांचे फावते. दिवसातून चारसहा बकरे त्यांना सहज मिळतात, व विस-पंचवीस हजारांची सहज कमाई होत असते. आम्ही सुद्धा सायबर गुन्हा कसा नोंदवायचा माहीत नसल्याने तसेच रक्कम फारशी नसल्याने थोडक्यात बचावलो म्हणत विषय थांबवला.

जर तुमच्या घरात अश्याच प्रकारची घटना घडली असल्यास जरूर व्यक्त व्हा. बऱ्याच वेळेस, आपण चेष्टेचा विषय होऊ नये म्हणून अश्या घटना, कुणाला सांगत नाही, तिथेच मोठी चूक घडते. व्यक्त झाल्यास इतर कोणी फसू नयेत हा शुद्ध हेतू असतो, यात फसलो म्हणजे आता मी चेष्टेचा विषय होईन ही मानसिकता ठेवू नका. मी पण याच भावनेने आपल्यासमोर व्यक्त झालो आहे.

वरील कथानक सत्य घटनेवर आधारित आहे.

विजय लिमये (9326040204)

टीप– सुरक्षित डिजिटल पेमेंट इकोसिस्टम प्रदान करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सायबर फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1930 आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म https://www.cybercrime.gov.in कार्यान्वित केले आहे. सायबर फसवणुकीत फसवणूक झालेल्या व्यक्तींना त्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकरणांची तक्रार करण्यासाठी हे व्यासपीठ एक यंत्रणा प्रदान करते.

error: Content is protected !!