बदल ही प्रत्येक जिवंत व्यवस्थेची अपरिहार्यता आहे. पण काही बदल हे उथळ असतात — केवळ परिस्थितीशी जुळवून घेतलेले. तर काही बदल खोलवर परिणाम करणारे असतात — जे मूल्यं, दिशा, आणि ओळख यांपर्यंत पोहोचतात. अशा बदलांना संधीने नव्हे तर धोरणात्मक निर्णयांनी जन्म दिला जातो.
बऱ्याचदा आपण म्हणतो, “काहीतरी बदलायला हवं”, पण त्या मागे उद्दिष्टं स्पष्ट नसतात, ना दिशा ठरलेली असते. अशावेळी बदल वरवरचा राहतो. परंतु जेव्हा निर्णय विचारपूर्वक, दीर्घदृष्टीने आणि ठामपणे घेतले जातात, तेव्हा तो बदल केवळ आजच्या समस्येचा उपाय न राहता उद्याची नवी वाट ठरतो.
याचं एक शक्तिशाली उदाहरण म्हणजे Samsung कंपनीचा 1995 सालचा निर्णय. त्यावेळी सॅमसंगची सुमार दर्जाचे मोबाईल हॅडसेट्स बनवणारी कंपनी अशी ओळख होती. कंपनीचे अध्यक्ष ली कून-ही यांनी संपूर्ण कंपनीचा दर्जा बदलण्याचा संकल्प केला. त्यांनी थेट 250 कोटी रुपयांचे हजारो फोन व उपकरणं सर्व कर्मचाऱ्यांसमोर जाळले. हे फक्त उत्पादन नष्ट करणं नव्हतं — हा एक ठाम संदेश होता: “या क्षणापासून गुणवत्ता हेच मूल्य!”
सॅमसंगचा हा निर्णय त्या काळात धाडसी वाटला असेल, पण हाच निर्णय त्यांच्या यशाचं बीज ठरला. आजच्या स्पर्धात्मक बाजारात Samsung जेवढं विश्वासार्ह, नावाजलेला ब्रँड म्हणून ओळखला जातो, तो केवळ नविन तंत्रज्ञानामुळे नव्हे, तर त्या एका धोरणात्मक वळणामुळे.
मोठा बदल घडवण्यासाठी केवळ भावना पुरेशी नसते. हव्या असतात ठोस कृती, आणि त्या कृतीला आधार देणारी भूमिका. आपणही अनेकदा जीवनात, व्यवसायात, किंवा समाजात बदलाची वाट पाहतो. पण तो बदल खऱ्या अर्थाने घडवायचा असेल, तर जुने मार्ग, चुकीचे साचे, चुकीची माणसं — यावर कठोर निर्णय घ्यावे लागतात.
धोरण हा एक तात्पुरता उपाय नसतो, तर दीर्घकालीन दृष्टीचं प्रतिक असतो. जो बदल सच्चा असतो, तो सुलभ नसतो. पण जो धोरणात्मक असतो, तो टिकून राहतो. त्यामुळेच —
“धोरणात्मक निर्णयाशिवाय मोठा बदल अशक्य असतो.”


