सर्वश्रेष्ठ कर्मवीर महात्मा श्रीकृष्ण जन्मच काळकोठडीत. जन्माला येण्याअगोदरच मरण समोर वाढून ठेवलेलं. स्वतःचा जवळचा माणूस मामाच जीवावर उठलेला. खुद्द भगवान विष्णूंचा अवतार तरीही भोग चुकले नाही. पण म्हणून त्यानं कुणाला दोष दिला नाही की शिव्यांची लाखोली वाहिली नाही. रडारड तर मुळीच नाही. आयुष्यभर हा महापुरूष फक्त हास्यमुखासहच वावरला. वडिलांनी ठरवलं याला वाचवायचं, गोकुळात आपल्या चूलत भावाकडे गुपचूप नेऊन ठेवायचं. वसुदेव बाळाला घेऊन पडला तर कधी नव्हे इतका मुसळधार पाऊस चालू झाला. यमुना पार करण्यासाठी नदीपात्रात उतरला तर नदीला महापूर आला. नदी पार करणे म्हणजे जीवननैया पार करण्यासारखेच होते. पाणी वसूदेवाच्या माथ्यापर्यंत पोहचले. मरण आ वासून उभे होते, पण नुकताच जन्मलेला कृष्ण फक्त हसत होता.
बाळ पोहचले गोकुळात, विसावले यशोदेच्या कुशीत. आताही बाळाची मुद्रा हास्यानं तेजोमय झालेली होती. कित्येक वर्षे आता जन्मदात्यांपासून ताटातूट, तीही अगदी जन्मतःच. जिने जन्म दिला तीचे दुधही प्यायला मिळणार नव्हते, अन् नाहीच मिळाले. कृष्णाने कधीच तक्रार केली नाही. ना या गोष्टीला त्याने कंसाला जबाबदार मानलं, ना देवकीला, ना वसूदेवाला. आज कित्येक मुलेमुली एवढ्यातेवढ्या गोष्टींवरून आपल्या जन्मदात्यांना बघा काय काय बोलताना दिसतात. जर सांभाळता येत नाही तर जन्म कशाला दिला? हा तर ठरलेला प्रश्न खरे तर अवतारी पुरूष, पण घेऊन आला काळा रंग. सगळेच त्या रंगामुळे कान्हा, कृष्णा म्हणायला लागले. बारसंही झालं नाही, केवळ रंगावरून लोकांनी नाव दिलं. दिलं काय पडलं म्हणा ना! पण तेही याने हसत हसत स्विकारले. आयुष्यभर तेच नाव अभिमानाने त्रिलोकात मिरविले अन् अजरामर केले.
ज्यानं खरे तर महालात राहायला हवं होतं, पंचपक्वानांचा आहार ग्रहण करायला पाहिजे होता; तो कृष्ण गरीब गोपगड्यांसोबत वनात खेळत होता तोही अगदी आनंदात, त्यांच्यासोबतच दही,भात, भाकरीचा गोपाळकाला फस्त करत होता. कंसाचा वध करेपर्यंत परंपरेनुसार क्षात्र व राजविद्येचं शिक्षणही त्याला लाभू शकलं नव्हतं. पण त्याला त्याची ना पर्वा ना दुःख. आनंदात राहणे हाच जगण्याचा मूलमंत्र होता.
लहानगा असताना जगणं अवघड, सतत मरण अवतीभवती वावरत असायचे. किती असुरांनी त्याच्यावर हल्ला केला याची गणतीच नाही. कुठल्याही लहानग्याचे जगणे एवढे बेभरवशाचे नसेल. गोकूळातही त्रास देणारे काही कमी नव्हते. जिवाला प्रिय असलेल्या लोकांचा विरह तर पाचवीलाच पुजलेला होता. पहिल्यांदा तुटले जन्मदाते. मग सुटले गोकूळ, सगळे गोप सवंगडी, यशोदा माता, नंदबाबा. कंसाचा वध करणे हे कृष्णासाठी धर्म आणि कर्म दोन्ही होते. त्यासाठी त्याने गोकूळविरह हसत हसत सहन केला. कंसवधाचा सूड घेण्यासाठी जरासंघासारखे लोक सारखे मथुरेवर आक्रमण करत होते. मथुरेच्या भल्यासाठी त्यानं मग मथुराही सोडली. जिच्यावर लहानपणापासून जीवापाड प्रेम केलं ती राधा मागे पडली. ज्या बासरीने गोप, गोपिकाच नाही तर प्राणिमात्र, वृक्षवल्लींना मोहवून टाकलं, जिने कृष्णाला अपार आनंद दिला तीही बासरीही गोकूळ सोडल्यानंतर त्याच्या ओठांवर कधी आली नाही. तो द्वारकेला गेला, नवीन नगरी वसवली. पण पुढे तीही सोडावी लागली. एवढं सगळं होत असताना त्याच्या मुद्रेवरंच हास्य तसूभरही कमी झालं नाही.
क्षत्रिय म्हणून जे गुण असायला हवे ते सगळं इतरांपेक्षा कृष्णाकडे काकणभर काय मणभर जास्त होतं. राजा बनण्यासाठीच्या सगळ्या अटी, शर्ती तो लिलया पुर्ण करू शकत होता. तरीही त्याच्या नशीबी कधी राजपाट आला नाही. त्याचीही त्याने कधी तक्रार केली नाही. कृष्ण आणि रूक्मिणीचं प्रेम तर जगजाहीर आहे. कुठल्याही माणसाने आपली कन्या वा बहीण कृष्णाला भार्या म्हणून सहज दिली असती एवढं कर्तृत्व श्रीकृष्णाने गाजवलं होतं. पण तरीही रूक्मीणीच्या भावाला तो रूक्मीणीसाठी मान्य नव्हता. कृष्णाला रूक्मीणीहरण करून तिच्याशी लग्न करावे लागले. एवढं सगळं घडत असतानाही त्याच्या ह्रदयात होते प्रेम व सुमुखावर तेच गोड हास्य. हस्तिनापुराच्या दरबारात कित्येकदा अपमान वाट्याला आला. दुर्योधन,शकुनीने कित्येकदा गवळ्याचा पोर म्हणून हिणवले. कित्येक प्रस्ताव काही कारण नसताना नाकारले. शिशुपालाने किती त्रास दिला. पण कृष्ण प्रत्येकवेळी शांत व हसतमुखच होता. गांधारीने संपुर्ण यादवकूळ नष्ट होण्याचा शाप दिला, तोही त्याने हसत हसत स्विकारला.
अखेरच्या काळात सुदर्शन चक्रानेही कृष्णाची साथ सोडली. बरं, मरण कसे यावे? ज्याच्यापुढे भल्या भल्या क्षत्रियांचे तेज निस्तेज झाले, महारथींची शस्त्रे गळून पडली, महान योध्दयांचे पाय थिजले; त्याला मरण आले एका आदिवासीच्या साध्याशा बाणानं तेही अंगठ्याला लागून! संपुर्ण आयुष्य संघर्ष, कटकटी, कष्ट, अनपेक्षित घटनांनी भरलेले, पण तरीही आयुष्यभर श्रीकृष्ण त्रागा, तक्रार करताना दिसत नाहीत. आयुष्यभर ते मुखावर आणि मनातही शांतभाव व हास्य यांनाच सदोदीत साथीला ठेवतात.
श्रीकृष्णाने भगवद् गीता सांगितली नाही तर भगवान स्वतःच गीता होते आणी आहेत. कृष्ण म्हणजे कर्म, कृष्ण म्हणजे धर्म, कृष्ण म्हणजे प्रेम, कृष्ण म्हणजे शांती, कृष्ण म्हणजे क्षमा, कृष्ण म्हणजे ज्ञान, कृष्ण म्हणजे परम मैत्री, कृष्ण म्हणजे निष्काम यज्ञ, कृष्ण हाच वाटाड्या, कृष्ण हाच एकमेव सोबती, कृष्णच सखा, कृष्ण मोक्ष, कृष्णच परमानंद.
कृष्णाने आपल्याला शिकवलं बंडखोरी करायला. त्याने दाखविला रूढी व परंपरा यातील फरक, त्यानेच कुणाला देव म्हणायचं हे सांगितलं. इंद्राची पुजा सोडून त्यानेच तर गोवर्धन पुजा करायला सुरूवात केली. निसर्गाचे उपकार व महत्व त्यानेच अधोरेखीत केले. कालियामर्दन करत, असुरवध करत, कंसाला यमसदनी पाठवत दुष्टांना वेळीच अद्दल घडविण्याचे धडे त्यानेच दिले. जे योग्य आहे ते करण्यासाठी तो मोठ्या भावाच्याही विरोधात गेला तेही टोकाची कटूता टाळत. कंसाला मारेपर्यंत कृष्ण शाळेतच गेला नव्हता. कंसवधानंतर कृष्ण सांदीपन ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी गेला. तिथे त्याचा सर्वात प्रिय मित्र झाला गरीब ब्राम्हणाघरचा एक साधारण मुलगा सुदामा. कृष्णाने मैत्री करताना जात, पात, संपत्ती, समाजातील स्थान पाहत मैत्री केली नाही. एकीकडे अर्जुनासारखा सखा अन् दुसरीकडे सुदामासारखा मित्र. त्यासाठी जे काही करावे लागले ते त्यानं केलंच, पण जिथे गरज होती तिथे मित्राचे कान टोचायला कान्हाने मागेपुढे पाहीले नाही. राधा ही त्याच्यापेक्षा मोठी, पण वयाचा अडसर प्रेमात कधीच आला नाही. मथुरेतल्या व्यंग असलेल्या कुब्जेवरही त्याने निर्व्याज प्रेम केले. प्रेमासाठी, ते कुणावर करावे याच्या मोजपट्ट्या त्याने प्रेम करताना लावल्या नाहीत. म्हणून तर मीरासारखी राजकुमारीही त्याच्यावर सगळं आयुष्य ओवाळून टाकते अन् कान्होपात्रासारखी गणिकाही त्याच्यासाठी कृष्णमय होऊन जाते.
कृष्णाचा अवतार हा कंसाला मारण्यासाठी नाही तर धर्म पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी झालेला आहे. कंसाला मारण्याअगोदर कृष्णाने कुठलेही औपचारिक क्षात्र शिक्षण घेतलेले नव्हते. पण ते घेतल्यानंतर फार क्वचितच त्याने शस्त्र हातात घेतले. खरे तर महाभारताची लढाई तो एकटाच जिंकू शकत होता. किंबहुना द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीच सगळ्या अधर्मींचा निःपात करू शकत होता. अर्जुनाच्या मनातील शंका दूर करण्यासाठी वेळेचा अपव्यय कशाला? पण त्याच्यासाठी मनुष्य कर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म होता. म्हणून बरेचशा दुर्जनांचा नाश त्याने इतरांकडून कर्म करवून घेत घडवून आणला. तो फक्त त्याने गीतेत सांगितल्याप्रमाणे निमित्तमात्र होता. त्याने जे सांगितलं त्याबद्दलचा दोष त्यावेळी गांधारी, धृतराष्ट्र, दुर्योधन,शकूनी अशा कित्येकांनी त्याच्या माथी मारला. पण त्याचे कुठलेही स्पष्टीकरण करण्याच्या भानगडीत श्रीकृष्ण पडला नाही. पुढे भविष्यातही आपल्या डोक्यावर बरेचशा गोष्टींचा दोष मारला जात राहील हे माहीत असूनही जे जे प्रसंगानुरूप योग्य ते ते तो बिनदिक्कत करत राहीला. कारण कर्म करत राहणे यालाच त्याने धर्म मानले.
विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्ण, या अवतारास परमावतार म्हणतात. कारण तो एका पुर्ण पुरुषाचा अवतार होता. याच अवतारानं जगाला जगायचं कसं हे पुर्णतः शिकवलं. भगवान विष्णूच्या अवतारांना आपण वेगवेगळ्या रूपात बघत नाही व पुजत नाही, अपवाद फक्त श्रीकृष्णाचा. त्याला देवघरात बाळकृष्णाच्या रूपात पुजतो. वारकरी कर कटेवर ठेवलेल्या निशस्त्र विठ्ठलाच्या रूपात बघतात. गुजरातेत, राजस्थानात त्याला रणछोडदास म्हणजे रणांगण सोडून पळालेला अशा अवतारातही पुजतात.
गीतेतील कुठलेही प्रकरण घ्या. श्रीकृष्ण ते आपल्या आयुष्यात ते जगलेले आहेत असेच दिसून येईल. कृष्णनीती हा राज्यशास्त्र, युध्दशास्त्र, परराष्ट्रनीती यांसाठीचा मुळ संदर्भच म्हणावा लागेल. आजकाल स्वतःला चाणक्य बरेचसे म्हणून घेतात. पण कृष्ण म्हणवून घेण्याचे धाडस कुणीही राजनीतिज्ञ करत नाही, कारण कृष्णनीती पुर्णतः समजणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
असा हा पूर्णावतार कधीही कसलाही राग, लोभ, द्वेष, मोह, गर्व, मत्सर न बाळगता आपले संपुर्ण जीवन जगला. जय जय कृष्ण म्हणून नाही तर कृष्णाच्या कर्मसिध्दांतानुसार जगायला शिकून मग जय जय कृष्ण नामघोष केला तर खरच कृष्णमय होऊन कृष्णत्वास पोहचू.
जय श्रीकृष्ण
लेखन :- महेश कद्रे
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अवघ्या सहा मिनिटांत श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते द्वारकेच्या जलसमाधीपर्यंत, कालियाच्या मृत्यूपासून ते महाभारत युद्धाच्या घटनांपर्यंत इतके अप्रतिम दृश्य चित्रण करणे कुणालाही शक्य झाले नसते.
जय श्रीकृष्ण


