बेरोजगारी म्हटलं की अनेकांचे कान टवकारले जातात. राजकीय लोकांना तर वादावादी, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आयते खाद्य मिळते.
फार मागे जायची गरज नाही साधारण शंभर वर्षापूर्वी आपल्या देशात किती बेरोजगार होते? याची आकडेवारी नसल्यासारखीच होती. त्यावेळेस आपल्याकडे फारशी साधन संपत्ती नव्हती, शेती हाच एकमेव पूरक व्यवसाय असल्याने बहुतेक जनता शेती व्यवसायातच गुंतलेली होती, असे असतानाही बेरोजगार नावाचा रोग ऐकिवात आला नाही.
शिवाय, बारा बलुतदार यात कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार, हे व्यवसायाभिमुख लोक होते, जे शेतीसहित इतर व्यवसायांना जोडधंदा म्हणत उदरनिर्वाह करत असत.
याच कुळातील लोक, पुढे मूल्यवर्धन करण्यासाठी (value addition), व्यवसाय विस्तार करून, विविध धातूंची व आकाराची भांडी बनवत, घर बनविण्यासाठी विटा, कवेलू, बनवून व्यापार विस्तार करत. थोडक्यात काय तर बारा बलुतेदार ह्या संकल्पनेला पूर्ण रूप आले होते आणि प्रत्येक जण याचा भाग बनून, आपला उदरनिर्वाह योग्य रितीने होत आहे याची व्यवस्था पाहत होता.
औद्योगिक क्रांती ने आपले पाय घट्ट रोवले आणि यंत्रयुग अवतरले, त्यातून रोजगाराच्या संधी वाढल्या. धातुशी निगडित कामकरी यंत्र व्यवसायात चपलखपणे सामावले. पारंपरिक व्यवसायाला नवीन दिशा मिळाली. पुढे, विजेचा शोध लागला, आणि आणखी नवीन क्रांती झाली. विजेचा वापर यंत्रात होऊन, माणसांचे कष्ट हलके झाले. विजेची विविध उपकरणे शोधली गेली आणि रोजगाराच्या संधी वाढत गेल्या.
पुढे अर्थ क्रांती झाली, वित्तीय संस्था आल्या, रोजगार वाढले. मूळच्या तीन अभियांत्रिकी शाखांना अनेक पिल्ले झाली, ज्यांची आजची संख्या अंदाजे पंचवीस झाली आहे. तसेच इतर विज्ञान शाखेत अनेक पोटशाखा उदयास येऊन, अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढली.
थोडक्यात काय तर शेकडो वर्षापासून ठराविक असलेल्या रोजगार व्यवसायात अनेक नवीन फ़ांद्या फुटल्या. प्रश्न हा भेडसावतो की, तरीही बेरोजगारी वाढतच राहिली, व वाढतच आहे हा विरोधाभास नाही का होत?
सिमित व्यवसाय दालने असतानाही हजारो वर्षात बेरोजगारी नव्हती, पण अगणित व्यवसाय दालने उघडली असतानाही बेरोजगारीचा मात्र जन्म झाला. वैज्ञानिकांनी जितके म्हणून शक्य होईल, विज्ञानाची प्रगती करत, रोजगरसंधी वाढवल्या, मात्र आपण करंटेच राहिलो व राहणार आहोत.
मुळात बेरोजगारी ही सापेक्ष असते असे माझे मत आहे. मी अनेक व्यवसायीक लोकांना त्यांची मते मागितली, त्यात बहुतेक जण जे म्हणाले ते सर्वसाक्षी सत्य आहे. त्यांचा कौल होता, की आमच्या कामात भरपूर मागणी आहे, पण योग्य व कुशल मनुष्यबळ नसल्याने आमच्यासारख्या कुशल लोकांच्यावर कामाचा अतोनात ताण आहे. नवीन कुशल व्यवसायी तयार होत नाहीत, कारण त्यांना झटपट श्रीमंत बनायचे असते, म्हणून जी मिळेल ती नोकरी करून, त्यातून कुशलता वाढवणे हे त्यांना पटत नाही. या बेरोजगारांना हे सांगणे आवश्यक आहे की जगात जे जे लोक यशस्वी लोक व्यावसायिक म्हणून स्थापित झाले, त्यांनी कोणे एके काळी अतिशय काबाड कष्ट उपसले आहेत. अगदी अल्प मजुरीवर काम करून कुशलता आत्मसात करणे हे ध्येय धोरण ठेवले, म्हणून आज ते मोठे झालेले दिसतात. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले क्वचितच नावारूपास येतात, त्यातले जे यशस्वी होतात त्यांचे महत्त्वाचे कारण, यांचे वडील त्यांना सामान्य कामगारांच्या सोबत वाढवून व्यवसायातील खाचाखुणा अनुभवातून शिकवतात. थोडक्यात, संसार थाटायचा असेल तर सुरुवात, मीठ-मिरचीचा भाव समजून घेऊन करावी लागेल.
विपुलतेला एक शाप आहे. जे जे विपुल आहे त्याची नासाडी जास्त केली जाते, मग ते पाणी, हवा, पीक असो की मनुष्यबळ. लोखंड मुबलक असल्याने, भंगारात विकले जाते पण सोन्याचा छोटा कण सुद्धा अमूल्य असतो, याचे एकमेव कारण त्याची उपलब्धता कमी आहे.
जंगलात एक नियम आहे, तिथे जेव्हा गवत खाणारे प्राणी संख्येने अगणित होतात, तेव्हा तेच जंगलाच्या ऱ्हासाचे साधनसुचीता बनतात. म्हणून त्यांची संख्या आटोपशीर ठेवायला, मांस भक्षी प्राणीच कामी येतात.
अन्न साखळी मध्ये मानवाने बुध्दीच्या जोरावर स्वतःला जरी वेगळे केले असेल तरी निसर्गासमोर तो खुजाच राहणार आहे.
लोकसंख्येच्या अफाट वाढीने आज, आपल्या देशात मनुष्यबळ, विपुलतेच्या शापाने ग्रस्त झाले आहे. सरकारी नोकरीच हवी यासाठी अगदी शिपायाची नोकरी स्वीकारण्यासाठी MBA, MSC झालेले तरुण अर्ज करतात हे वाचून किव येते. सरकारे मतपेटीवर डोळा ठेऊन सकारात्मक परंतू कठोर निर्णय राबवत नसल्याने, बेरोजगारीची समस्या अजुन घातक होणार आहे.
विजय लिमये (9326040204)


