कचऱ्यातून कला या संकल्पनेचा आधार घेऊन आम्ही सर्वसामान्यपणे, अत्यंत दुर्लक्षित आणि कोणत्याही व्यक्तीला, तिकडे कधीही जाण्याची इच्छा होत नाही, अशी दहनघाट जागा निवडली.
दहनघाट सुशोभित करण्याचा विडा आम्ही उचलला, आणि नागपूर येथील अंबाझरी दहन घाट, सुंदर आणि सुरेख घाट बनू शकतो हे उदाहरणासहित दाखवले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहन घाटावर प्रेतासोबत येणाऱ्या वस्तूंचा कलात्मकतेने वापर करून दहनघाट सुशोभित करण्यात आला आहे.
सर्वात प्रथम आम्ही तिरडीचे बांबू वापरून दहन घाटावरील सर्व रस्त्यांच्या बाजूला सुशोभित कठडे बनवले आहेत आणि कठड्यांना आकर्षक रंग दिले आहेत. पुढे याच बांबूंचा वापर करून घाटावरील रस्त्यांवर मांडव तयार केलेला आहे ज्यावर आकर्षक फुलांच्या वेली सोडलेल्या आहेत.
दहन घाटावर फुलझाडे निवडताना आम्ही विविध रंगांची, सुवासिक, तसेच मध देणाऱ्या फुलझाडांना प्राधान्य दिले आहे, त्यात प्रामुख्याने आपल्या भागात फोफावणारी देशी फुलझाडे प्रामुख्याने निवडलेली आहेत, ज्यात जास्वंद, मोगरा, पारिजातक, देशी गुलाब, मॉर्निंग ग्लोरी, दूध मोगरा, तगर, जाई, जुई, चमेली, मधुमालती, मधुकामीनी अशी दोन फुटापासून सहा फुटापर्यंत वाढणारी फुलझाडे आणि वेली लावली आहेत, त्यांना आता सुरेख फुले येऊ लागलेली आहेत.
झाडांना भरपूर फुले येण्यासाठी खत आवश्यक असते यासाठी जवळपासच्या गोशाळेतून शेणखत आणून ते पसरवण्यात आले आहे त्याचबरोबर नातेवाईकांनी मृतदेहांची सोडलेली राख खत म्हणून वापरण्यात आली आहे ज्यामुळे झाडांना लागणारी सर्व प्रकारची खनिजे मिळाल्याने झाडे टवटवीत आहेतच शिवाय फुलांनी बहरलेली आहेत. प्रेतांवर वाहिलेल्या हार, फुले, यांचा वापर झाडांना खत म्हणून करण्यात येत आहे.
विदर्भातील हवामान उष्णकटिबंधीय असल्याने झाडांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, त्याकरिता लागणारे पाणी आम्ही दहन घाटाच्या बाजूने जाणाऱ्या नाग नदीतून पंपाद्वारे उचलले आहे. नाग नदीतून जाणारे सांडपाणी असूनही बाग मात्र टवटवीत फुललेली दिसते.
एकूणच पाहिले तर या एकदा वापर झालेल्या वस्तूंचा, पुनर्वापर करण्याची कला साधली आहे, त्यातून दहनघाट स्वच्छ राहतोय, योग्य तऱ्हेने वापर केल्याने सुशोभीत दिसतोय.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहन घाटावर मोठ्या संख्यने विविध रंगाची फुलपाखरे बागडताना दिसतात. त्या फुलपाखरांना खाण्यासाठी पक्षी पण येऊ लागले आहेत एकूणच अन्नसाखळी तयार करण्यात यशस्वी झालो आहोत.
भारतात गावोगावी दहनघाट आहेत, या सर्व दहन घाटांचा असा योग्य तऱ्हेने वापर केल्यास प्रदूषण रोखण्यास मोलाचे सहाय्य होऊ शकते. दहन घाट भीतीयुक्त न राहता स्वर्गद्वार भासतील.
विजय लिमये (9326040204)
(लेखक परिचय ~ मोदीजींनी त्यांच्या पर्यावरणपूरक मोक्षकाष्ठ या संकल्पनेचे कौतुक केले आहे)


