कधी विचार केला आहे का, की एखादी कंपनी, एखादा समाज किंवा अगदी एखादं राष्ट्र जर दीर्घकाळापर्यंत बरं चालत असेल, सतत प्रगती करत असेल, तर त्यामागे काय असेल? हे सगळं काही फक्त नशिबाच्या जोरावर घडतं का?
आपण अनेकदा बघतो की काही ठिकाणी गोष्टी वर्षानुवर्षं सुरळीत चालतात. आर्थिक स्थैर्य असतं, नवीन कल्पनांना वाव असतो, लोक समाधानात असतात. आणि मग काही लोक लगेच म्हणतात – “त्यांचं नशीब जोरात आहे”, “त्यांना सगळं तयार मिळालंय”, “सिस्टम त्यांच्या बाजूने आहे.”
पण जरा खोल विचार केला, तर लक्षात येईल – इतकी स्थिरता, इतकं सातत्य, हे निव्वळ नशिबाने शक्य नाही. काही ना काही तरी ते बरोबर करत असतात, जे बाकीच्यांना दिसत नाही किंवा जरी दिसलं, तरी पेलवत नाही. ते वेळच्या वेळी बदल स्वीकारतात, चुका कबूल करतात, सुधारणा करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं – ते एकाच दिशेने सातत्याने चालत राहतात.
हे सगळं विचारात न घेता, जर आपण त्यांना सरसकट दूषणे द्यायला लागलो, तर ते कितपत योग्य ठरेल?
कधी कधी आपण एखाद्यावर टिका करत असतो, आणि आपल्यालाच माहिती नसतं की त्यांच्या यशामागे किती विचार, किती मेहनत, आणि किती काळजी घेतलेली आहे. त्यांच्या जागी आपण असतो, तर आपण तीच कामगिरी करू शकलो असतो का, हाही प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
थोडक्यात काय, तर सतत यशस्वी राहणं हे काही सोपं नसतं. आणि जे हे करून दाखवतायत, त्यांच्याकडे पाहताना थोडा आदर ठेवला, तर आपलंच विचारविश्व समृद्ध होईल.


