पूर्वीचं स्क्रॅप बुक म्हणजे काय असायचं? जुन्या वह्यांची उरलेली कोरी पानं एकत्र करायची, स्टेपलर मारायचं आणि झाली स्क्रॅप बुक तयार. कोणत्या पानावर चिकटवायचं, कुठं खरडायचं, कुठं कापायचं — सगळं आपलं आपण ठरवायचं. एकदम देशी जुगाड.
पण आता? स्क्रॅप बुक म्हणजे चकचकीत कव्हर, थिम असलेली पानं, ‘क्राफ्ट फ्रेंडली पेपर’ (हो, असा एक प्रकार असतो म्हणे!), आणि काही वेळा तर ‘pre-designed templates’. सर्जनशीलतेचं आता प्रीपॅक्ड किट मिळतं!
शाळा सांगतात, “स्क्रॅप बुक हवीच हवी – पण ती आमच्या लिस्टमध्ये दिलेलीच.”
दुकानं म्हणतात, “हो, तीच आहे… पण डिझाईन तीन प्रकारात येते!”
आणि पालक म्हणतात, “हो का? मग दोन्ही घेवूया – एक डिझाईन प्रोजेक्टसाठी आणि एक थोडी अजून क्रिएटिव्ह वाटते म्हणून!”
मग मुलं काय करतात? पानं वळवतात, मध्ये मध्ये रंग भरतात, आणि चुकून जरी एखादं पान वाकडं चिकटलं तर चिंता करतात — “आई, नवीन स्क्रॅप बुक घ्यावी का?”
म्हणजे आता स्क्रॅप बुक ही रफ नाही, रिच गोष्ट झालीये! जिथं आधी मोकळेपणा होता, तिथं आता प्रेझेंटेशन आहे. जिथं प्रयोग होते, तिथं आता परफेक्शन आहे.
आणि गंमत अशी की, ‘स्क्रॅप’ या शब्दाचा अर्थच आहे — उरलेलं, विस्कळीत, न वापरलेलं. पण आपण आता स्क्रॅप बुकसुद्धा प्लॅन करून घेतोय!


