एक शहाणा वृद्ध गृहस्थ निवृत्तीनंतर एका शाळेजवळ साधंसं घर घेऊन राहायला आला. सुरुवातीचे त्याचे काही दिवस शांततेत आणि समाधानात गेले. पण सुट्ट्या संपल्यानंतर शाळा सुरू झाल्यावर परिस्थिती बदलली. दुपारी शाळा सुटल्यानंतर काही खट्याळ मुलं गल्लीमधून जाताजाता प्रत्येक कचऱ्याच्या डब्यावर टणाटणा वाजवत जात. हा गोंगाट रोजचाच झाला, आणि अखेर त्या शहाण्या माणसाने काहीतरी उपाय करण्याचं ठरवलं.
पुढच्या दिवशी दुपारी तो बाहेर गेला आणि त्या मुलांना थांबवत म्हणाला, “तुमचं काम भारी आहे रे! असा उत्साह बघायला खूप मजा येते. लहानपणी मीही असंच करायचो. एक काम कराल का? रोज इथे येऊन असंच वाजवत जा; मी तुम्हा तिघांना प्रत्येकी एक रुपया देईन.” मुलांना भारी आनंद झाला आणि त्यांनी अजून जोरात वाजवायला सुरुवात केली.
काही दिवसांनी तो वृद्ध पुन्हा त्यांना भेटला आणि म्हणाला, “बघा रे, माझं बजेट थोडं कमी झालंय. आता मी तुम्हाला फक्त पन्नास पैसे देऊ शकतो.” मुलं थोडी नाराज झाली, पण त्यांनी मान्य केलं.
अजून काही दिवसांनी तो पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला, “अरे अजून पेन्शनचा चेक आलेला नाही, आता फक्त पंचवीस पैसेच देऊ शकेन. चालेल का?”
“पंचवीस पैसे?” टोळक्यातल्या एका मुलाने नाराजीत विचारलं, “आम्ही पंचवीस पैशांसाठी वेळ वाया घालवणार नाही! आम्ही निघालो!”
आणि त्या शहाण्या माणसाला उरलेलं आयुष्य शांततेत घालवता आलं.
असंच तुम्ही एखाद्या समस्येला चतुराईने हाताळून स्वतःच्या आणि इतरांच्याही आयुष्यात हास्य आणि समाधान आणू शकता.


