संधी

एक माणूस दररोज देवळात जाऊन देवाला एकच विनंती करतो, मला लॉटरी लागू दे! एक दिवस तो असे म्हणताच, त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड बसते! तो गांगरून इकडे तिकडे पाहतो, पण कोणीच जवळपास दिसत नाही, तीतक्यात आकाशवाणी होते. “अरे मूर्ख, आधी तू लॉटरीचे तिकीट विकत घे, मग माझ्याकडे ये, त्याशिवाय तुला कशी लॉटरी लागणार?” तिकीट विकत घेणे ही संधी आहे, ती साधल्याशिवाय संधीचे सोने कसे होणार?

संधी नेहेमीच चालून येत असते…., असे मराठीत म्हणतात, परंतू ती जरी चालून आली तरी ती तुमच्यासाठी थांबत नाही…., “तिला पकडावे लागते”. जर पकडण्याची वेळ साधली तर आपण यशस्वी होतो. वास्तविक, मी म्हणेन आपल्याला संधीकडे जायला हवे, तिची येण्याची वाट कशाला पहायची?

आपल्या जीवनातही अनेक प्रसंग असेच येत राहतात, प्रत्येकाला जीवनात एक संधी मिळतेच ज्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण, अदभूत, करण्याची प्रेरणा मिळते. फार थोडे लोक अश्या मिळालेल्या संधीचे सोने करतात, व मोठे होतात. माणसाने संधीसाधू असलेच पाहिजे. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, वगैरे म्हणींनी अनेकांना रसातळाला नेले आहे.

यशस्वी लोकांना विचारा, तुम्ही शून्यातून विश्व कसे उभे केलेत? ते हेच सांगतील, काळाची गरज ओळखली, थोडा धोकाही पत्करला म्हणून प्रवाह पार करून गेलो व अजून पुढची प्रगती करण्यासाठी नवीन बळ प्राप्त झाले. बहुसंख्य लोक संधी सोडतात म्हणून, उर्वरित आयुष्यात हालअपेष्टा सहन करतात. अयशस्वी लोक नशिबाला दूषणे देत राहतात, मात्र एकांतात मान्य करतात, मी चुकलो त्यामुळे असा राहिलो.

विधात्याने.., दरिद्री नारायणाला सुद्धा नवकोट नारायण बनण्याची अशीच एक संधी दिलेली असते, परंतू ती कोणती व कशी साधायची हे न समजल्यामुळे त्याला दारिद्र्यात आयुष्य काढावे लागते. बऱ्याच वेळेस एखादी संधी हुकली तर विधाता अजून एखादी संधी पण देतोच, पण तिच्याकडे जाऊन तिला पकडणे न उमगल्यामुळे उर्वरित जीवनात ससेहोलपट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पृथ्वीराज चौहान पेक्षा मुहम्मद घोरीला मी जास्त श्रेष्ठ मानतो, कारण पृथ्वीराज चौहानला इतके उदार होण्याची गरज नव्हती, पहिल्या वेळेस घोरी हरला तेव्हाच त्याला संपवला असता तर पुढचे रामायण घडलेच नसते. घोरीला एकच संधी मिळाली, आणि त्याने तिचा पुरेपूर फायदा घेतला, ज्याचा परिणाम आपण आजही भोगत आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध संधी साधून केला, आणि महाराष्ट्रात आजही त्यावर पोवाडे गायले जातात.

संधी साधायची असल्यास भाविष्यकाळाचा वेध घेता आला पाहिजे, उद्याच्या जगाला काय हवंय, हे ज्याला आज समजले, तो उद्याचा राजा होणार. धीरूभाई अंबानी, बिल गेट्स (विलियम हेनरी गेट्स), आपला झुकरबर्ग, असे अनेक आहेत, जे निम्न मध्यम वर्गातून आलेले असतानाही, केवळ संधी शोधून आज ध्रुव ताऱ्यासारखे अढळ स्थानावर विराजमान झाले आहेत.

मानवाच्या प्रगतीतील अनेक वळणे जगाला नवीन दिशेला घेऊन गेली. आदिमानवाने सर्वात प्रथम आगीचा शोध लावला, व जीवन थोडे सुकर झाले, मग चाकाचा शोध लागला, पुढे शस्त्रांचा शोध लावल्यामुळे स्वबचाव, व शिकार ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. दळणवळण हा विषय अनादिकालापासून मानवासाठी खूप महत्त्वाचा होता व आजही आहे. अंतर जलद कापण्यासाठी दोन पायावर चालणे, हि पहिली आणि एकमेव प्रगती शरीरात झाली, उर्वरित जलद प्रवास हा इतर वाहनांच्यामुळे होऊ लागला. घोडा हे वाहन मात्र जवळपास 5000 वर्ष जगात अग्रेसर रहिले.

एकोणिसाव्या शतकापर्यंत घोडा हेच प्रमुख वाहन राहिले. जेम्स वॉट ने वाफेची शक्ती ओळखली, तिचा उपयोग करून घोडा निरूपयोगी ठरवला, आणि यांत्रिक युग सुरु झाले. पण त्यालाही काही मर्यादा होत्या, त्यामुळे रेल्वे इंजिनाशिवाय त्याचा फारसा वापर कुठेही झाला नाही. त्याच इंजिनात महत्वाचे फेरबदल करून, रुडॉल्फ डिझेल या जर्मन वैज्ञानिकाने डिझेल इंजिनाचा शोध लावला. या शोधाने जग कोळशातून द्रवरूप इंधनाकडे वळले, जे साठवायला सोपे, कमी जागेत मावू शकले, अश्वशक्ती वाढली, इंजिनाचा आकार छोटा झाला, व वजन कमी झाले.

आज दीडशे वर्षानंतरही रुडॉल्फने लावलेल्या इंजिनाच्या शोधात आमूलाग्र बदल झालेला नाही हे विशेष. या शोधाचे सर्व हक्क ज्याला पेटंट म्हणतो, ती सोय त्या काळात असती तर, आज रुडॉल्फ डिझेल हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणला गेला असता. दुर्दैव याला म्हणतात, डिझेल इंजिन बनवताना आणि विविध प्रयोग करताना, हा वैज्ञानिक कर्जबाजारी झाला, व त्याने बोटीतून उडी मारून आत्महत्या केली….. काही जण म्हणतात त्याचा खून करण्यात आला, असो… आज डिझेल इंधन माहित नसणारा जगात कोणीच नाही. पण या इंधनाला कुणाचे नाव दिले गेले हे मात्र फार थोड्या लोकांना माहित आहे. तात्पर्य काय, शोध लावताना अनेक वेळा यश अपयशाला न घाबरता तोंड देणारा रुडॉल्फ आपला शोध कसा क्रांतिकारक होणार आहे हे पाहण्यासाठी थोडा धीर धरू शकला नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बरेच लोक असेच काहीतरी नाविन्यपूर्ण करताना, यश जवळ येत असता, धीर सोडतात, व अपयशाच्या खाईत लोटले जातात.

सचिन तेंडुलकर नाही का नर्व्हस नाईन्टीचा कित्तेक वेळा शिकार झाला? शेअर मार्केट मध्ये अनेक लोक असेच घाबरून पैसे घालवतात, त्यांना धीर धरता येत नाही. बँकेत आठ वर्षाची मुदतठेव करतात, मग तोच पैसा चांगल्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवला तर, त्याचे चार वर्षात दुप्पट होतात, हे काही त्यांना पटत नाही, आणि शेअर बाजाराला सट्टा, जुगार म्हणत दूषणे देतात. आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील.

सर्कशीत अगदी शेवटी पांढऱ्या कपड्यात महिला व पुरुष हवेत उंचावर झोपाळ्यांचे घेत दाखवतात. त्यांची वेळ साधण्याची कला अप्रतिमपणे सादर केली जाते, आणि प्रेक्षकांची वाहवा मिळते. असे होताना मध्येच एक विदूषक त्यात घुसतो, आणि त्याला जाणूनबुजून पाडले जाते, इथे प्रेक्षकांच्यात हशा पिकतो, हा मनोरंजनाचा भाग म्हणून दाखवला जातो.

खऱ्या जीवनात संधीची वेळ नाही साधली तर, आपला विदूषक होतो, व नियती आपल्यावर हसते. संधीच्या शोधात रहा, आलेली संधी मात्र कधीही सोडू नका.

विजय लिमये, (9326040204)

error: Content is protected !!