सन १९७७ . डॅनिएल एव्हरेट नावाचा एक ख्रिश्चन धर्मप्रचारक ब्राझीलमधील ऍमेझॉन जंगलात राहणाऱ्या पिराहा (Pirahã) या छोट्या आदिवासी जमातीकडे जातो. ऍमेझॉनच्या जंगलात अत्यंत अलिप्त असं जीवन जगणाऱ्या या जमातीचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करणे हा त्याचा उद्देश होता. डॅनिएलचं कुटुंब एक कट्टर आणि निष्ठावान मिशनरी असल्याने त्याची बायको आणि दोन लहान मुलंहि त्याच्या सोबत जातात. या पिराहा जमातीचा बाहेरच्या जगाशी संपर्कच नसल्याने त्यांची भाषा , संस्कृती जगावेगळी होती. त्यांना त्यांच्या भाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेचे ज्ञान नव्हते. मग आता त्यांना बायबल कशी शिकवणार? हा यक्षप्रश्न डॅनिएलपुढं होता.
डॅनिएल आधी त्या लोकांची भाषा शिकायचं ठरवतो. ती शिकल्यानंतरच तो बायबलचे भाषांतर त्यांच्या भाषेत करू शकणार होता.
डॅनिएल आपल्या धर्मासाठी इतका समर्पित होता कि त्या आदिवासी लोकांसोबत राहायचा निर्णय त्याने घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. कारण त्या घनदाट अरण्यात राहणं म्हणजे स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालण्यासारखं होतं. पावलोपावली तिथं मृत्यू लपलेला होता. ऍमेझॉन जंगलातले हिंस्त्र पशु , तऱ्हेतऱ्हेचे विषारी साप , कीटक आणि मलेरिया डेंगू सारख्या जीवघेण्या आजारांचे साम्राज्य.
अश्या परिस्थितीत डॅनिएल पिराहा लोकांसोबत तब्बल तीस वर्षे घालवतो. या तीस वर्षात तो त्यांची भाषा शिकतो. त्यांची संस्कृती आत्मसात करतो. त्या लोकांत तो त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यासारखा मिसळून जातो. शेवटी तो त्यांच्या भाषेत बायबलचे भाषांतर करून त्यांना बायबल शिकवतो. त्यांच्या भाषेत बायबलचे ऑडिओ रेकॉर्ड करून ते ऐकवतो. परंतु एवढ्या अथक परिश्रमानंतर डॅनिएलसोबत जे घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं.
एव्हरेट त्या जमातीच्या भाषेच्या आणि जीवनपद्धतीच्या अभ्यासात इतका गुंतला की त्याने त्यांच्या जगण्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली. एव्हरेटच्या लक्षात आलं कि , त्या लोकांपाशी ना मोजणीची पद्धत होती, ना रंगांसाठी ठराविक शब्द, ना युद्धाची संकल्पना, ना खाजगी मालकीची हाव…त्यांच्यापाशी भूतकाळ-भविष्यकाळ याबद्दल गुंतागुंतीच्या कल्पना नाहीत. “माझं-तुझं” अशी खाजगी मालकीची तीव्र भावना नाही. ते एकमेकांशी प्रामाणिक आहेत. हिंसा, फसवणूक, सत्तासंघर्ष यांचा अभाव आहे. या लोकांची भाषा वेगळी आणि अत्यंत अल्प अश्या शब्दसंग्रहाने युक्त असल्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धतही वेगळी आहे. उदाहरणार्थ: त्यांच्याकडे अचूक मोजणीचे गणित नाही, त्यामुळे “अधिक/कमी” एवढ्यापुरताच विचार ते करतात. भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ असे गुंतागुंतीचे कालभेद नाहीत , त्यामुळे वर्तमानात जगण्यावर त्यांचा भर आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट एव्हरेट नोटीस करतो ती म्हणजे पिराहा लोकांच्या डोक्यात देव , धर्म अश्या संकल्पनाच नाहीत.
आणि तरीही ते लोक शांत, समाधानी आणि समतोल आयुष्य जगत होते. ते लोक अत्यंत आनंदात जगत होते. इतके कि त्यांच्या चेहऱ्यावर कायम असे स्मितहास्य होते. भरपूर हास्यविनोद करत ते जगत होते. प्रतिकूल परिस्थितीतहि , उदाहरणार्थ पावसामुळे झोपडीवरील छप्पर कोसळून पडले तरीही ते त्या घटनेकडे पाहून जोरजोरात हसायचे आणि लगेच दुसऱ्याच्या झोपडीत आश्रय घ्यायचे. आजाराने/ सर्पदंशाने मृत्यू , आजारपण या त्यांच्या आयुष्यातल्या दैनंदिन घडामोडी असल्याने मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनही त्यांचा दुःखवादी नसून सहज होता. कितीही वाईट घटना घडली तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळत नव्हते. परंतु याचा अर्थ असा नव्हता कि त्यांना एकमेकांबद्दल प्रेम काळजी आणि जिव्हाळा नाही. त्यांच्यात आपसांत मदतीची भावना, प्रेम , काळजी आणि एकमेकांच्या सुरक्षेची भावनाही जबरदस्त होती. फक्त अभाव होता तो नैराश्य, चिंता आणि द्वेष हिंसा इत्यादी भावनांचा.
डॅनिएलला आता प्रश्न पडू लागलेत. ज्या लोकांना देव धर्म मसीहा अवतार इत्यादी संकल्पनाच माहित नाहीत तरीही ते लोक इतके संतुष्ट आनंदी आणि नैतिक जीवन कसे काय जगू शकत असतील? त्यांना कशाचा मोह नाही, ते उद्यासाठी काहीही जमवून ठेवत नाहीत, भूक लागल्यावरच आणि भूक लागली तरच अन्न शोधतात. कंटाळा आला तर तीन तीन दिवस जेवणही करत नाहीत, अन तरीही रात्रभर शेकोटी पेटवून नाचतात हसतात खिदळतात. हे कसे शक्य आहे?
डॅनिएल आता त्या लोकांना येशु मसिहाबद्दल त्यांच्या भाषेत सांगायला सुरवात करतो. ते फार उत्साहाने बायबल मधल्या गोष्टी ऐकतात. परंतु ते डॅनिएलला एकच प्रश्न विचारतात, तू स्वतः येशुला बघितले आहे का? यावर डॅनियल प्रामाणिकपणे उत्तर देतो “नाही”. पिराहा लोक येशूवर विश्वास ठेवायला नकार देतात. हा नकारही अत्यंत निरागस, प्रेमळ आणि द्वेषरहित असतो. कारण प्रत्यक्ष डोळ्याने बघितल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवणे हा त्यांच्या संस्कृतीचा भाग होता. ते फक्त त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात ज्या त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आहेत. म्हणजेच एका अर्थाने पिराहा जमातीचे लोक नैसर्गिकपणे बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. ते येशूला स्वीकारायला नकार देतात. परंतु ते डॅनिएलला प्रेमाने स्वीकारायला तयार असतात. कारण डॅनिएल त्यांच्यासोबत प्रत्यक्ष राहात असतो.
तीस वर्षांच्या अथक आणि कठोर परिश्रमानंतर डॅनिएलच्या लक्षात येतं कि जे मिशन घेऊन आपण या लोकांपाशी आलो होतो ते असफल झालं. पण हे निष्फळ झालं नाही हि दुसरी गोष्ट त्याच्या लक्षात आली. निष्फळ झालं नाही कारण पिराहा लोकांचे धर्मपरिवर्तन करायला म्हणून गेलेला डॅनिएल आता स्वतःच परिवर्तित झाला होता. माणूस देव धर्म इत्यादी संकल्पना डोक्यात न ठेवताही एक आनंदी, निश्चिन्त , सहज , सरळ , संतुष्ट , प्रेमयुक्त , हिंसारहित जीवन जगू शकतो हे तो पिराहा लोकांकडून प्रत्यक्ष अनुभवाने शिकला होता समजला होता.
आपण जे सत्य मानतो ते सार्वत्रिक किंवा वैश्विक सत्य नसून ती केवळ आपली श्रद्धा आहे हे डॅनिएलला आता लक्षात आलं होतं.
डॅनिएल आतून संपूर्ण बदलला होता. ट्रान्सफॉर्म झाला होता. तो आता श्रद्धावान नव्हता. तो आता एक बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक झाला होता. पण त्याच्या मनात देव किंवा धर्माबद्दल आताही आकस नव्हता द्वेष नव्हता. त्याला फक्त सत्य काय ते कळलं होतं . धार्मिक विश्वास हा जन्मतः मिळालेला नसतो — तो परिस्थिती, संस्कृती आणि अनुभवांवर आधारित असतो. आणि जेव्हा माणूस स्वतःच्या विवेकाने, प्रश्न विचारून, अनुभवांवर विचार करतो…तेव्हा तो कोणत्याही ठाम विश्वासावर ही पुनर्विचार करू शकतो.
त्याला जे कळलं ते तो कुणाला सांगूही शकत नव्हता. कारण त्याचं कुटुंब , त्याच्या करिअरसाठी ते धोक्याचं होतं.
या अत्यंत कठोर आणि प्रदीर्घ अश्या जीवनप्रवासातून त्याला जो बोध झाला तो बोध तो मनातल्या मनात घेऊन अनेक वर्षे जगला. पण एका वळणावर येऊन त्याला आपल्या या शोधाचा सार व्यक्त करावासा वाटलं. त्यानं जसं ते व्यक्त केलं तसं तेच झालं जे त्याला अपेक्षित होतं… त्याच्या बायकोने त्याला (तो आता नास्तिक झाला म्हणून) घटस्फोट दिला. आणि मिशनरी लोकांनीही त्याच्यापासून दुरावा केला.
पण आता डॅनिएल खऱ्या अर्थाने मुक्त झाला होता. कारण त्याने परिश्रम घेऊन सत्य शोधून काढले होते. तो आता स्वर्ग नरक पाप पुण्य अश्या इतरांनी थोपवलेल्या कल्पनेतून मुक्त झाला होता. तो खऱ्या अर्थाने आता सुखी झाला होता. तो आता ख्रिश्चन नाही तर एक “पिराहा” झाला होता.
✍️ डॉ. विजय रणदिवे


