व्यसन हा शब्द जरी उच्चरला तरी सर्वांचे कान टवकारले जातात, व ते खरंही आहे. आम लोकांना व्यसन म्हटले की केवळ जुगार, कोकेन, गांजा, दारू, सिगरेट, खर्रा/मावा, तंबाखू हेच दिसेल. अर्थात असल्या व्यसनांनी लोकांचे संसार धुळीस मिळालेली अनेक उदाहरणे आसपास नेहेमीच दिसतात, म्हणून हे जास्त बदनाम आहेत.
महिलांना याचा प्रचंड त्रास होतो, आपल्या देशात नवऱ्याच्या असल्या व्यसनांनी सर्वात जास्त घरची स्त्री भरडली जातेच, सोबत, मुलांची ससेहोलपट पण होते. सर्व घराची राखरांगोळी झाली की हा मरतो, नंतर त्या घरात भयाण शांतता प्रस्थापित होते, व घराचे दुष्टचक्र समाप्त होते.
व्यसनांची व्याख्या वरील संदर्भातच संपते, का? माझ्या मते, अजून अनेक व्यसने आहेत जी, व्यक्तीच्या विनाशाला कारणीभूत ठरतात.
समाजात उसने अवसान आणून मोठेपणा दाखवणे, यात अंथरूण पाहून पाय पसरणे, ही म्हण मोडीत काढण्यात येते. केवळ समाजात मी पैशाच्या रुपात मोठा आहे हे दाखविण्यासाठी, आमदनीच्या कित्येक पट जास्त खर्च केला जातो. एक वेळ अशी येते, मिळकत व खर्च यांचा मेळ बसत नाही, आणि पत्त्यांचा महाल फुंकर मारल्यावर जसा कोसळतो, तसा, यांचा डौल ढासळतो. नुकसान घडून गेलेले असते, त्यामुळे पुढे घरातील प्रत्येकाला हालअपेष्टांचा सामना करावा लागतो.
भपका दाखविण्यासाठी मी लोकांना महागड्या चारचाकी गाड्या VIP नंबरसह, जास्त पैसे मोजून घेतलेले पाहिले आहे, व पुढे चारच महिन्यांनी वेळेवर हप्ते न भरता आल्यामुळे, फायनान्स कंपनीने उचलून घेऊन जातानाही पाहिले आहे. हे व्यसनच आहे ना?
खाण्यासाठी जगावे की जगण्यासाठी खावे! हे वाक्य आपापली मते द्या यासाठी टाकले, तर दोन्ही बाजूंचे हजारो अभिप्राय येतील, यात किती खावे, याचा विचार फारच मर्यादित स्वरूपात होईल. आज कित्येक लोक अतिखाण्यामुळे अनेक विकारांना तोंड देत आहेत, ज्यामुळे शरीराला त्रास होतोच आहे, सोबत डॉक्टरांचा हप्ता ही मरेपर्यंत द्यावा लागतो, याचे उदाहरण म्हणजे स्थूलपणा आणि मधुमेह. आजकाल मधुमेह तिशीत दिसू लागला आहे, जो पूर्वी साठीनंतर होत असे. सगळेच मधुमेह अतिखाण्याने होतात असे नाही, पण जे तिशीनंतर मधुमेही झाले आहेत, त्यांच्यात 60% पेक्षा जास्त हे अरबट, चरबट खाणे, अतिखाणे या मुळे झालेले निदर्शनास येते. दारू , सिगरेट, तंबाखू मुळे होणारे आजार वाईट असतात, तर मग अतिखाण्याने होणारे आजार वाईट नसतात का? मधुमेहाने आज देशात तितकीच माणसे मरत आहेत जितकी कॅन्सरमुळे, हे पण एक व्यसन नाही का?
अतिधार्मिक ही जमात, समाजात धार्मिक कमी, विकृत जास्त भासते. यांच्या घरात वर्षभर काहींना काही धार्मिक विधी सुरू असतात. बरं स्वतःपुरते करतील तर ठीक, दर दोन तीन महिन्यांनी धार्मिक विधी करून पन्नास, शंभर लोकांना जेवू-खाऊ घालतील, केवळ हे ऐकून घेण्यासाठी की, ” तुम्ही खूप धार्मिक आहात, बुआ! किती देवाचे करता, वगैरे”. धार्मिकता हा श्रद्धेचा विषय आहे, हे मी पण मानतो, श्रद्धा असावी पण श्रद्धेच्या नावाखाली अवडंबर नको ना? हे सुद्धा एक व्यसनच आहे, काही लोक हे मानायला तयार होणार नाहीत, व या मतावर माझा कडाडून विरोधही करतील. याला व्यसन म्हटले यावरही मला टीका सहन करावी लागणार आहे, हे मी जाणतो, तरीही मी हे जाणीवपूर्वक लिहीत आहे.
काही लोकांना सारख्या वस्तू बदलण्याचा शौक असतो, अत्यंत महागड्या वस्तू जसे फोन, गाड्या, घरातील वस्तू, हे दर वर्षी बदलतात, यात लाखोंच्या वस्तू केवळ वर्ष दोन वर्षात जुन्या झाल्या म्हणून हजारोत विकायला काढतात. मान्य आहे कुबेराचा तुमच्यावर वरदहस्त आहे, म्हणून तुम्हाला हे चोजले सुचत आहेत, यात पैशाचा असा व्यय होताना दिसत नाही का? तुमच्या कामगारांचे पगार वाढवताना हाथ थरथरतात, त्याच्या दहापट जास्त खर्च घरचे फर्निचर बदलण्यावर खर्च केला जातो, तोही दोन तीन वर्षात, ते चालते. कित्येक नट, नट्या एकदा वापरलेला ड्रेस, परत वापरत नाहीत असे ऐकले आहे, जर हे खरं असेल तर, हे ही व्यसनच ठरत नाही का? घरात कपाटे ओसंडून वाहतील इतक्या साड्या, ड्रेसेस असतात तरी महिला कुढत असतात. काळ बदलत असतो!, एकेकाळच्या रंगेल नट-नट्याना उत्तरार्धात दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झालेली सर्वांनी वाचलेली असेलच.
खोटे बोलणे, लावालाव्या करणे, समाजात गैरसमज पसरवणे, असल्या व्यसनातून अनेक जण समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. अश्या लोकांना सामाजिक कार्यक्रमात जाणीवपूर्वक टाळले जाते कारण ते एक व्यसन आहे.
लोकांच्याकडे सतत उधार मागणे, मग ते पैसे असो, की वस्तू. घेतलेले उधार पैसे-वस्तू वेळेत परत न देणे, यामुळे भविष्यात पुन्हा गरज भासली तर कोणीही मदतीला येत नाही. मी अनेक महाभाग पाहिले आहेत, जे उधारीचे पैसे परत मागितल्यावर भांडतात, पैसे देण्यास टोलवाटोलवी करतात, त्यांच्या घरी गेल्यास बायको-मुलांना मी घरी नाही, असे खोटे बोलण्यास शिकवतात.
फुकटचे सल्ले देणे, विचारले नसतानाही स्वतःहून शेजाऱ्यांना, अगदी दूरदूरच्या नातलगांना सुद्धा जाऊन सल्ला देणे, यातून असे लोक अकारण आमच्या संसारात लुडबुड करत आहेत असा काहीसा गैरसमज समाजात पसरतो. सल्ला मागितला तरच द्यावा, घेणाऱ्याला त्याची किंमत राहते. फुकट मिळालेली प्रत्येक चीज ही कवडीमोलाची भासते.
आपण यात कुठे बसत नाही ना? खात्री करून घ्या! असल्यास, स्वतःच्या आचरणात आमूलाग्र बदल करा.
~ विजय लिमये, नागपूर
लेखक परिचय – ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते, “मोक्षकाष्ठ” या त्यांच्या संकल्पनेची दखल पंतप्रधान मोदींना घ्यावी वाटली.


