एका भक्ताने भगवान शंकराला फारच पिडलं होतं.
त्याने दिवसरात्र पूजारूपी घोशा लावला होता—”मला हे दे, मला ते दे, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझी ती इच्छा पूर्ण कर.” भोळ्या शंकरांना त्याच्या या सततच्या मागण्यांमुळे झोपही लागेना. अखेर भक्ताची आर्तता पाहून ते प्रसन्न झाले आणि त्याच्या हातात एक शंख ठेवत म्हणाले, “बाबा रे, या शंखाकडे माग जे हवं ते, आणि आता मला शांत राहू दे.”
शंकर अंतर्धान पावले, आणि भक्ताचे देवाशी सारे व्यवहार थांबले. शंखच आता त्याचा परमेश्वर झाला. त्याने शंखाची ताकद तपासायला सुरुवात केली. सोन्याचं नाणं मागितलं, ते मिळालं. हिऱ्याचा हार मागितला, तोही मिळाला. मग महाल, पत्नी, संपत्ती—जे जे मनात आलं, सगळं शंखाकडून मिळवू लागला.
आता त्याचं जीवन सुखात चाललं होतं. पण नेमका तो साधुबुवा त्याच्याकडे आला. भक्ताने मोठ्या प्रेमाने त्याला घरात बोलावलं, पाहुणचार केला. त्याचवेळी त्याला लक्षात आलं की साधुबुवांकडे एका कपड्यात गुंडाळलेली वस्तू आहे, ज्यावर ते विशेष लक्ष ठेवत होते. कुतूहलाने त्याने विचारलं, “महाराज, ही काय वस्तू आहे, जी तुम्ही इतक्या जपून ठेवलीय?”
साधुबुवा हसत म्हणाले, “ही प्रत्यक्ष शंकराची भेट आहे.” त्यांनी कपड्यातून एक मोठा शंख बाहेर काढला—त्याच्या शंखापेक्षा दुपटीने मोठा. “हा महाशंख आहे,” ते म्हणाले, हा महाशंख प्रत्येक गोष्टीची दुप्पट करतो. तू एक महाल माग, तो दोन देईन म्हणतो. तू एक घडा भरून मोहोरा माग, तो दोन घडे देईन म्हणतो.
हे ऐकून भक्ताच्या मनातली आपल्या शंखावरील श्रद्धा कमी झाली. तो म्हणाला, “माझ्याकडेही एक शंकराने दिलेला शंख आहे. पण, तो फक्त हवं तेवढंच देतो. हा महाशंख मला द्या, आणि तुम्ही माझा शंख घ्या. तुमच्यासारख्या संन्याशाला इच्छापूर्ती शंखाची गरज तरी काय?”
साधुबुवा म्हणाले, “ठीक आहे. पण हा शंख रात्री बारा वाजता मागणं पूर्ण करतो. त्या वेळेपलीकडे काहीही मागशील, तर शंख निकामी होईल.”
रात्री बारा वाजता भक्ताने महाशंखासमोर उभं राहून मागणं मागायला सुरुवात केली. “मला एक महाल दे,” तो म्हणाला. महाशंख म्हणाला, “एक काय, दोन देतो.” भक्त म्हणाला, “ठीकाय, दोनच दे.” शंख म्हणाला, “दोन कशाला, चार देतो.” भक्त वैतागला, “अरे, दे ना चार.” महाशंख म्हणाला, “चार कशाला, आठ देतो.”
हे आठ, सोळा, चौसष्ट, एकशे अठ्ठावीसपर्यंत पोहोचलं. तेव्हा भक्ताला साधुबुवांचे शब्द आठवले—”हा शंख दुप्पट देईल असं म्हणतो, पण प्रत्यक्षात काही देत नाही.”
भक्ताच्या मनात खंत दाटली, “साधुबुवा जर इथे असते तर मला समजावलं असतं.” महाशंखातला आवाज म्हणाला, “एक साधू कशाला? दोन साधूंची भेट घडवतो.”
भक्ताने कपाळावर हात मारून घेतलं आणि म्हणाला, “मीच खरा महाशंख ठरलो.” महाशंखातून आवाज आला, “एक नाही, दोन महाशंख!”
~ ओशो
तात्पर्य:
अतिआकांक्षा आणि हव्यास माणसाचा घात करतात. समाधान बाह्य वस्तूंमध्ये नसून, स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवण्यात आहे. अन्यथा माणूस स्वतःच स्वतःला फसवत राहतो.


