आज कोणताही भारतीय पदार्थ घ्या – झणझणीत रस्सा, तिखट मसालेदार भाजी, किंवा तोंडाला चव आणणारी चटणी – मिरचीशिवाय त्याची कल्पनाच करता येणार नाही. पण गंमत म्हणजे, मिरची मूळ भारतीय नव्हेच! ती भारतात आली दक्षिण अमेरिकेतून, पोर्तुगीज व्यापारामुळे. आणि आली तेव्हा कुणाला माहीत होतं, की ही छोटीशी गोष्ट आपल्या पदार्थांना नुसती चव देणार नाही, तर स्वयंपाकघराचा आत्माच होऊन जाईल?
मिरची भारतात आली आणि अगदी कानामागून आली तशी तिखट झाली! काही शतकांतच तिने भारतीय पदार्थांमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. आज जगात सर्वाधिक प्रकारच्या मिरच्या भारतातच सापडतात – तिखट मिरचीपासून गोडसर मिरचीपर्यंत, बारीकशी चिंचोळी मिरचीपासून मोठ्या सुक्या मिरच्यांपर्यंत.
परदेशातून आले, पण आपलेच झाले!
मिरचीसारख्याच, अनेक गोष्टी बाहेरच्या देशांतून भारतात आल्या, पण आपल्या उपयुक्ततेमुळे आणि भारतीय स्वयंपाकात सहज मिसळून गेल्यामुळे त्या आपल्याच वाटू लागल्या.
जसे की,
चहा – मूळ चीनचा, ब्रिटीशांनी भारतात मोठ्या प्रमाणात लावणी केली.
कॉफी – आफ्रिकेतील इथिओपिया आणि अरबी देशांतून भारतात आली.
पेरू (ग्वावा) – दक्षिण अमेरिकेतून स्पॅनिश लोकांनी आणला.
चिकू – मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतून पोर्तुगीजांनी आणला.
पाइनॅपल (अननस) – दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन द्वीपसमूहातून.
मका – मूळ अमेरिकेतला, पण आता भारतात सर्वत्र लोकप्रिय.
राजमा – दक्षिण अमेरिकेतून पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी आणला.
सोयाबीन – मूळ चीन व जपानमधून भारतात आला.
बटाटा – दक्षिण अमेरिकेतून (विशेषतः पेरू आणि बोलिव्हिया) पोर्तुगीजांनी आणला.
टोमॅटो – दक्षिण अमेरिका, पोर्तुगीज आणि स्पॅनिश व्यापारामुळे भारतात आला.
इतिहासात व्यापार, वसाहतशाही आणि स्थलांतर यामुळे अनेक खाद्यपदार्थ भारतात आले. पण फक्त आले म्हणून ते स्वीकारले गेले नाहीत—त्यांच्या चवीने, उपयोगितेने आणि उपलब्धतेने ते भारतीय स्वयंपाकघराचा, आहाराचा भाग झाले.


