“संधीचं सोनं करायचं” असं नेहमी सांगितलं जातं, पण संधी समोर आली की अनेक जण घाबरतात, गोंधळतात किंवा मागे हटतात. यालाच “कच खाणं” म्हणतात. ही वृत्ती आत्मघातकी ठरते, कारण तयारी, क्षमता आणि संधी यांचा संयोग घडला तरी शेवटी निर्णायक कृतीच भवितव्य ठरवते.
काही लोक मेहनत घेतात, तयारी करतात, पण निर्णायक क्षणी आत्मसंशय त्यांना गाठतो. हा संशय मागे खेचतो आणि ज्यांची तयारी कमी असते, पण निर्णय घ्यायचं धाडस असतं, ते पुढे जातात. शेअर बाजार असो, उद्योग-व्यवसाय असो, की आयुष्यातले मोठे निर्णय—अनेकदा संधी एका क्षणासाठीच उपलब्ध असते. आपण निर्णय घेईपर्यंत इतर कोणी तरी ती संधी घेऊन पुढे जातो.
महिनोंमहिने किंवा वर्षानुवर्षे मेहनत करून शेवटच्या क्षणी मागे हटलात, तर सगळी तयारी वाया जाते. ज्या लोकांची ही मानसिकता असते, ते गोल लाईनवर येऊन माघार घेतात. त्यानंतर त्यांना अपराधी वाटतं, स्वतःवर राग येतो, पण ते काही उपयोगाचं नसतं. एकदा का कच खाल्ली, की ती सवय लागते. पुढच्या वेळी संधी आली तरी मागच्या अपयशाचं ओझं मनात असतं आणि तोच नकारात्मक विचार पुन्हा मागे हटायला भाग पाडतो.
यावर उपाय म्हणजे, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं. जास्त विचार करत बसण्यापेक्षा ठाम भूमिका घेणं. तयारीवर विश्वास ठेऊन (तयारी मात्र १००% हवीच – अगदी हार पचवायची सुद्धा) अती-सुरक्षिततेच्या शोधात संधी न गमावणे. जोखीम घेण्याची सवय लावली, की आत्मविश्वास वाढतो. अपयश आलं तरी ते अंतिम नसतं, त्यातून शिकण्याची संधी असते.
ज्या क्षणी मोठी संधी उभी असते, त्या क्षणीच खरी परीक्षा असते. कच खाल्ली तर पराभव ठरलेलाच असतो, पण आत्मविश्वासाने निर्णय घेतला, तर अपयश आलं तरी ते संधीमध्ये बदलता येतं. पुढच्या वेळी निर्णायक क्षण उभा राहिला, तेव्हा स्वतःला एकच गोष्ट आठवू द्या—”कच नाही खायची, खेळ जिंकायचा!”
मोठ्या गोष्टींतच नव्हे तर अगदी एखाद्याला ठणकावून सांगायचं झालं तरी ऐनवेळी कच खाता कामा नये.


