निवड लढाईची

सतत लढत राहणं हे सामर्थ्याचं लक्षण नसतं. प्रत्येक लढाई लढायची गरज असतेच असंही नाही. काही लढाया थकवणाऱ्या असतात, काही जिंकूनही निरर्थक वाटतात आणि काही सोडून देण्यातच जास्त फायदा असतो. योग्य लढाई निवडली तरच मिळवलेल्या विजयाला अर्थ असतो. “युद्धाची सर्वोच्च कला म्हणजे लढा न देता शत्रूला शरण आणणे.” सन त्झूच्या या विचारातून संघर्षाचं खरं स्थान आणि त्यामागचं शहाणपण कळून येतं.

गरज – संघर्षाचा पाया

लढाई लढण्यामागचं कारण स्पष्ट आहे का हे तपासणं महत्त्वाचं. काही संघर्ष अपरिहार्य असतात. स्वाभिमान, नाती, भविष्य, मूल्यं या गोष्टींसाठी. पण काही केवळ सवयीच्या किंवा अहंकाराच्या पलीकडे काहीच देत नाहीत. गरज खरी आहे की केवळ भावना उचल खाऊ लागल्या आहेत हे पाहायला हवं.

राखीव ऊर्जा – शक्ती वाया घालवायची का

प्रत्येक संघर्षाला किंमत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक. काही लढाया जिंकूनही मनःशांती हरवते. त्यामुळे कुठे सर्व ऊर्जा खर्च करायची आणि कुठे साठवायची हे ठरवायला हवं. शक्ती साठवणं हेही कधी कधी विजयाचं लक्षण असतं.

जिंकण्याची शक्यता – विजयाचा व्यवहार

भावना आणि वास्तव यातलं संतुलन महत्त्वाचं. कुठलीही लढाई जिंकण्यासाठी आहे का की फक्त अडगळीत जाण्यासाठी. आपण केवळ हट्टाने खेळत आहोत की शहाणपणाने जिंकण्याची संधी शोधतोय. शक्यता मोजता आली पाहिजे. प्रत्येक रणांगण आपल्यासाठी नाही.

जिंकल्यावरचा आनंद – क्षणिक की खोलवर

काही वेळा लढाई जिंकली तरी समाधान राहत नाही. काही विजय पोकळ वाटतात, तर काही पराभव शिकवण देतात. कुणासाठी लढतोय, कशासाठी लढतोय, आणि जिंकल्यावर काय मिळणार आहे याचा अंदाज महत्त्वाचा.

हरल्यावरची अवस्था – पराभव पचेल का

जोखीम मोजली नाही तर नुकसान अटळ असतं. काही लढाया हरल्यावर उभं राहता येतं, पण काहींचा धक्का मोठा असतो. शक्य असेल तर हरल्यावर काय होईल ह्या प्रश्नाचं उत्तर आधी शोधावं. कधी कधी माघार हीही एक यशस्वी चाल असते.

सामंजस्याचा पर्याय – संघर्षापेक्षा समजुतीला स्थान

सतत समोरूनच लढण्याची गरज नसते. काही वेळा योग्य वेळेची वाट पाहणं अधिक फायदेशीर ठरतं. काही प्रसंगी सरळ संघर्षाऐवजी समजुतीने तोडगा काढणं अधिक परिणामकारक ठरतं. संघर्ष लादणं आणि संघर्ष सोडवणं यात फरक आहे. दोन्ही टोकांना न जाता योग्य तोडगा काढणं हे शहाणपण आहे.

शेवटी…

लढाई निवडणं म्हणजे जिंकण्याच्या किमतीचा हिशोब मांडणं. काही वेळा संयम अधिक फायद्याचा ठरतो आणि काही वेळा माघार घेणं पुढील मोठ्या विजयाची तयारी असते. लढाई जिंकली तरी हरल्यासारखं वाटायला नको आणि पराभव झाला तरी स्वतःला हरवल्यासारखं वाटता कामा नये.

Choosing your battles wisely is more important than sharpening your combat skills.

error: Content is protected !!