कल्ट संस्कृती!

कोणतीही अशी व्यवस्था जी हळूहळू विचार करण्याऐवजी फक्त अनुसरण करण्याची सवय लावते ती अस्वस्थ करणारी असते. कल्ट संस्कृती नेमकं तेच करते. सुरुवात कदाचित प्रेरणा किंवा belonging पासून होते. पण हळूहळू व्यक्तीची ओळख गटाच्या ओळखीत विरघळते.

सर्वात आधी बाजूला पडतं ते म्हणजे व्यक्तिमत्त्व. माणसाची किंमत त्याच्या स्वतंत्र विचारांवर नाही तर तो गटाशी किती जुळतो यावर ठरते. वेगळा विचार धोकादायक वाटू लागतो आणि सहमती सुरक्षित वाटते. शेवटी व्यक्ती उरत नाही, फक्त भूमिका उरते.

ही संस्कृती गटबाजी वाढवते. जग ‘आपण’ आणि ‘ते’ अशा दोन भागात विभागलं जातं. सत्यापेक्षा निष्ठा महत्त्वाची ठरते. संवाद कमी होतो आणि बचावात्मक भूमिका वाढते. मतभेद हे शिकण्याची संधी न राहता विश्वासघात मानले जातात. अशा वातावरणात विचारांची वाढ होत नाही, फक्त echo chamber तयार होतो.

याचा पुढचा परिणाम म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता कमी होते. प्रश्न विचारणं हळूहळू बंद केलं जातं. शंका घेणं कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. लोक गोष्टी सत्य म्हणून स्वीकारत नाहीत, तर त्या वारंवार ऐकल्या म्हणून स्वीकारतात. त्यामुळे निर्णयक्षमता कमकुवत होते.

कल्ट संस्कृती माणसाला वास्तवापासूनही दूर नेत असते. खोट्या श्रेष्ठत्वाची भावना निर्माण करते. लोक स्वतःला ‘निवडलेले’ किंवा ‘विशेष’ समजू लागतात. ही भावना हळूहळू megalomania कडे झुकते. वास्तवातील मर्यादा आणि संतुलन हरवतं.

शेवटी ही संस्कृती जिंकण्याची मानसिकता पसरवते. सहअस्तित्वाऐवजी विस्तार आणि वर्चस्व यावर भर दिला जातो. इतरांना समजून घेण्याऐवजी त्यांना बदलण्याचा किंवा हरवण्याचा प्रयत्न केला जातो.

खरी वाढ अंधानुकरणातून होत नाही. ती जागरूकतेतून होते. स्वतःचा विचार स्पष्ट ठेवण्याची क्षमता आणि तरीही शिकण्याची तयारी यातून होते. जी संस्कृती व्यक्तिमत्त्वाला कमी लेखते, प्रश्न विचारणं थांबवते, वास्तव विकृत करते आणि वर्चस्वाला प्रोत्साहन देते ती व्यक्तिमत्वाची वाढ खुंटवते.

कारण शेवटी ताकद ही किती लोक एकाच मार्गावर चालतात यावर नसते. ती प्रत्येकजण आपला मार्ग किती स्पष्टपणे पाहतो यावर असते.

error: Content is protected !!