एका माणसावर मोठं आर्थिक संकट येतं. निराश होऊन तो उद्यानात बसलेला असतो. तेव्हा एक धनिक त्याच्याशी बोलतो आणि मोठ्या रकमेचा चेक देतो. “गरज पडली तर वठव” असं सांगतो.
तो माणूस चेक तिजोरीत ठेवतो. आणि कामाला लागतो. कारण आता मनात एक गोष्ट असते — गरज पडली तर आधार आहे. हळूहळू तो मेहनत करतो, धाडसाने निर्णय घेतो, भीती कमी होते, काही महिन्यांत त्याची परिस्थिती सुधारते. शेवटी कळतं की चेक कधीच वापरला गेला नाही. कारण खरी जादू पैशात नव्हती आधाराच्या भावनेत होती.
काही माणसं सुद्धा अशीच न वठवलेल्या चेकसारखी असतात. त्यांची प्रत्यक्ष मदत घेण्याची वेळ क्वचितच येते पण ते आहेत ही जाणीवच मनाला धीर देऊन जाते.


