हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखणारे काही लोक असतात म्हणे. त्यांच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यायलाच हवी, पण मला मात्र माणसाची ड्रायव्हिंग स्टाईल पाहून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो! रस्त्यावरची त्याची वागणूक म्हणजे तो जीवनात कसा आहे याचं एक जिवंत प्रतिबिंब.
रस्त्यावर काही लोक अचानक मध्ये घुसतात, झूम करून पुढे निघून जातात – हे आपमतलबी असतात. त्यांना फक्त स्वतःचं बघायचं असतं. काही लोक इंडिकेटर देऊन पटकन वळतात, जणू नियम पाळायचं नाटक करत असतात – हे नियमाआड दडणारे. तर काही सिग्नल मोडून दुसऱ्यांना अक्कल शिकवतात, जणू रस्ता त्यांच्याच बापाचा आहे – हे दांभिक.
काही लोक सतत हॉर्न बडवून वाट काढतात, अधीर आणि स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणारे. काहींना नियम वगैरे गुळगुळीत वाटतात, म्हणून अवाच्या सवा वेगात गाडी हाकतात – उत्साही पण बेफिकीर! तर काही गाडी सतत कट मारत पुढे नेतात, हे लोक धूर्त आणि संधीसाधू असतात.
काही लोक मात्र एकदम संथ गतीने चालतात, गेल्या गाडीचा धूर बघत उशिरा निघतात, संधी घालवणारे! तर काही नेहमी संयमाने आणि नियम पाळून गाडी चालवतात, जबाबदार पण कधी कधी फारच शिस्तप्रिय. काहींना धोका, वेग याची पर्वा नसते, हे लोक स्पीड ब्रेकरवरही वेगात जातात, परिणामांची फिकीर नसणारे.
आता काही जण असेही असतात, जे सतत आरशात पाहत मागे काय होतंय याकडे लक्ष देतात – हे भूतकाळात अडकलेले किंवा इतरांच्या मतांवर जगणारे. काही लोक सिग्नल सुटल्यावरही शांतपणे गाडी सुरू करतात, हे निर्धास्त, आपल्या लयीत जगणारे. काहींना मात्र दुसऱ्यांची सोय महत्त्वाची वाटते, ते इतरांना सहज वाट देतात आणि धन्यवाद मानतात, हे सहृदयी लोक!
पण रस्त्यावर काही लोक बेफिकीरिने वागतात. बेशिस्तपणे पार्किंग करणारे बिनधास्त आणि फक्त स्वतःच्या सोयीचा विचार करणारे. डावीकडून ओव्हरटेक करणारे हे शॉर्टकट शोधणारे, नियम तोडूनही पुढे जाणारे. तर सतत ब्रेक दाबत चालवणारे संशयी, सतत धोका वाटणारे किंवा निर्णय घेण्यास धजावणारे.
म्हणजेच, ड्रायव्हिंग हा केवळ गाडी चालवण्याचा विषय नाही, तो माणसाच्या संपूर्ण जगण्याच्या शैलीचं दर्शन घडवतो. रस्त्यावरचा तुमचा स्वभाव, कळत-नकळत तुमच्या आयुष्यातही प्रतिबिंबित होतो.
तर, तुमची ड्रायव्हिंग स्टाईल तुमच्याबद्दल काय सांगते?


