खरं तर, जॉन डिअरच्या त्या इंटरव्ह्यूने माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिली. ईश्वराचा त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन!
कॉलेजच्या परीक्षेतील मार्क्स, जॉन डिअरची रिटन टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन या टप्प्यांतून आम्ही 7-8 जण पुढे गेलो होतो. पण खरी कसोटी इंटरव्ह्यूमध्ये होती.
माझा वर्गमित्र मकरंद — त्याला त्यांनी छंद, आवडी-निवडी विचारल्या. त्याने दिलखुलास अंदाजात एक सुंदर कविता म्हणून दाखवली. त्याच्या संवेदनशीलतेला त्यांनी बरोबर हेरलं. एका क्षणात त्याच्याबद्दल त्यांना खात्री पटली की हा माणूस काहीतरी वेगळं करू शकतो.
माझा नंबर आला तेव्हा त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला— “दुप्पट पगार दिला तर मशीन ऑपरेटरचं काम करशील का?”
माझं उत्तर स्पष्ट आणि ठाम होतं— “नाही!”
त्यांनी लगेच उत्तर दिलं—”चल निघ! (We’ll let you know!)”
तो क्षण काहीसा धक्का देणारा होता. पण नंतर समजलं की त्या एका प्रश्नाने त्यांनी माझं संपूर्ण व्यक्तिमत्त्व वाचून काढलं होतं.
उद्योग व्यवसायात टिकून राहायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली? लवचिकता! बाकी तुमचे गुण-दुर्गुण, हुशारी, अनुभव—या गोष्टी सेकंडरी आहेत.
हे मला तेव्हा कळलं नाही, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं— अडगेपणा आणि लवचिकतेच्या युद्धात यशस्वी नेहमी लवचिक माणसंच होतात.
तरीही, मुळातला अडेलतट्टूपणा अजूनही तसाच आहे…कुत्र्याची शेपटी!
दुसऱ्याच्या कलानं घेणं ही सुद्धा एक कला आहे – शिकायला खूप अवघड.
आणि एका प्रश्नातून समोरच्याचं व्यक्तिमत्व उलगडण्याची कला त्याहूनही अवघड!


