पॉझीटिव्ह थिंकिंगचे फॅड

“जे आपण मनात आणतो..आपण मनात ठेवतो.. तसंच घडतं ना डाॅक्टर?” मला जेव्हा अनेक पेशंटस् आणि सल्लार्थी विचारतात तेव्हा त्यांनी “द सिक्रेट” हे पुस्तक वाचलेले असते!

यात थीम आहे..”द लाॅ ऑफ एट्रॅक्शन “
यात एक खुळचट कल्पना मांडलीय..
तुम्ही सकारात्मक विचार केला की सकारात्मक घडते, नकारात्मक विचार केला की नकारात्मक घडते. कारण विचारांमध्ये ‘शुद्ध एनर्जी’ असते!
अशी एनर्जी-बिनर्जी वगैरे काही नसते पण अवैज्ञानिक द्यायचे ठोकून आणि सामान्य माणसाला गुंडाळायचे हे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल असे सांगणारे हे पुस्तक आहे, र्होंडा बायर्न चे.

पण या ‘लॉ ऑफ एट्रॅक्शन’ या संकल्पनेचा जन्म खूप पूर्वी झालेला आहे आणि या अगोदर याच कल्पनेवर आलेले पुस्तक खूप गाजले होते १९८५ मध्ये. हे पुस्तक लिहिणारी लेखिका होती इस्थर हिक्सेस आणि तिचा नवरा जेरी हिक्सेस.
खरं तर इस्थर ही असं म्हणायची की, एक आत्म्यांचा ग्रुप आहे आणि तिने ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ बद्दल जे काही लिहिले आहे ते त्या आत्म्यांनी सांगितले आहे! थोडक्यात इथे विज्ञानाचा काही संबंध नाही आणि त्या आत्म्यांच्या ग्रुपचे नाव तिने जे दिले होते ते होते “अब्राहम”. वास्तवात अजून आत्मा-बित्मा काही सिद्ध झालेले नाही. जवळपास नऊ पुस्तके लिहिलेल्या ईस्थर हीसेक्स ने असे सांगितले की, विश्व हे तुमचा गौरव करते आणि तुम्ही अमर व्हाल, जर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन चे नियम पाळाल! लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तत्व त्यांनी त्याही पूर्वी (१८६२-१९३२) प्रसिद्ध झालेल्या काही पुस्तकातून चोरले आहे, ‘थॉट व्हायब्रेशन्स’ हे विलियम वॉकर अॅटकिनसन्सच्या. हेच अवैज्ञानिक तत्व त्यानंतर नेपोलियन हिल्स या लेखकाने त्याच्या ‘थिंक अँड ग्रो रीच’ पुस्तकातून फैलावले.

समजुतींमध्ये प्रचंड ताकद असते आणि त्या आधारे आपल्याला अनेक गोष्टी आकर्षित करता येऊ शकतात ही खरे तर अंधश्रद्धा आहे. एखादी समजूत बाळगून तसेच घडेल यामध्ये एक तार्किक दोष असतो. त्याला प्लॅसिबो इफेक्ट आणि नोसिबो इफेक्ट म्हणतात. आपण ज्या समजूती बाळगतो त्या पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना म्हणतो.. आपल्या डोळ्यासमोर तसेच चित्र उभे करतो… जेणेकरून तसेच घडावे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करतो. पण या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तसेच घडते असे सिद्ध झालेले नाही. आपण आजारी असलो किंवा पेशंट आजारी असला तर बहुसंख्य वेळा अशा समजूती या आपल्याला भोळेपणाने व भीतीमुळे हे सर्व करायला लावतात. हे असे घडत नाही हे सांगणाऱ्या अनेक संशोधनातून दिसले आहे. उदाहरणार्थ रॉजर जान आणि रॉजर नेल्सन यांचे संशोधन. हिक्सेस जोडगोळीने कॉर्पोरेट जगामध्ये असे सांगायला सुरुवात केली होती की क्रिएटिव्हिटी किंवा नवनिर्मिती आणि कामामध्ये आनंदी राहणे हे पॉझिटिव्ह थिंकिंग मधून घडते. पण याला कुठलाही पुरावा मिळालेला नाही.

उलट नकारात्मक विचार हे जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि चिकित्सा सुरू करतात तेव्हा नवनवीन गोष्टी लक्षात येऊ लागतात. सकारात्मकता ठेवली तर आपण प्रश्न विचारत नाही. म्हणून नकारात्मकता ही बऱ्याच वेळा नवनवीन गोष्टी निर्माण करण्याला कारणीभूत ठरते. सकारात्मक किंवा जैसे थे वृत्ती ही न ठेवता हे असे का घडते, कधी घडते, कशासाठी घडते, वगैरे प्रश्न विचारून चिकित्सा आरंभली की प्रस्थापित ‘जैसे थे’ गोष्टींना सुरूंग लागतो आणि नवीन गोष्टी लक्षात येऊ लागतात किंवा त्यांचा शोध लागतो. विज्ञानाची हीच तर खासियत आहे. मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील तज्ञ झिंग झोवू यांनी केलेल्या संशोधनातून ‘निगेटिव्ह मूड हे घातक असतात हा गैरसमज आहे, त्यांचे मॅनेजमेंट करावे लागते आणि ते केले की आपण निगेटिव्ह गोष्टींना सुद्धा सरावू लागतो’ हे दाखविले आहे. अशावेळी थोडासा आधार मिळाला तर आपल्यातले दोष, वैगुण्य हे दिसून येतात आणि आपल्याला किती कष्ट करावे लागतील याचा अंदाज येतो. हे एक प्रकारे नकारात्मक विचारांचे सार असते.

एका संशोधनात असे आढळले आहे की जे नकारात्मक मूडमध्ये काम करतात ते कष्टपूर्वक कामे करतात आणि दीर्घकाळ काम करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता राहते. याच्या उलट ‘आशा’ ठेवून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये घडते. पाॅवर ऑफ थॉट किंवा विचारांचे सामर्थ्य असा प्रचार करणार्या ‘द सीक्रेट’ वाल्यांनी खरे तर ‘विचार भ्रम’ तयार केलेले आहेत. माझ्याकडे आलेले अनेक क्लायंट, रूग्ण, हे या विचार भ्रमाचे शिकार झालेले आहेत. याला ‘एम्पॉवरमेंट डिल्युजन’ असे म्हटले जाते. आपण नुसता असा विचार निर्माण केला, समजूत बाळगली किंवा देवाचे स्मरण केले की या विचार भ्रमातून आपल्याला संपन्न आरोग्य मिळेल, भरपूर पैसे मिळतील वगैरे असे भ्रम निर्माण होतात. गरिबी किंवा आजारपण हे त्या व्यक्तीचे दोष आहेत असे तत्त्वज्ञान मांडले जाते आणि जे अश्रद्ध असतात, जे देव मानत नाहीत, त्यांना ते भोगावे लागते असेही पुढे मांडले जाते! रेव्हरंड लक, जो ऑस्टिन, हे या विचाराचे समर्थक आहेत.

तुम्ही जशी कल्पना कराल तसे घडेल किंवा तसे मिळेल ही एक भंपक समजूत आहे. जी ‘द सीक्रेट’ मधून मांडण्यात आलेली आहे. जगामध्ये एक तृतीयांश लोकांना संडास धुवायला पाणी नसते अशा लोकांना तुम्ही.. “कल्पना करा की तुम्ही आरोग्य संपन्न राहावे” ही एक खुळचट समजूत आहे. भारतातील जातीप्रथेत गुरफटलेल्या लोकांनी जर नुसती कल्पना करून ते वरच्या जातीत गेले आहेत असे केले असते तर किती बरे झाले असते!! याला “न्यू एज मेटाफिजिकल जारगन” म्हणतात. हॅप्पी थॉट्स किंवा आनंदी विचार ठेवले म्हणून कॅन्सर बरा होईल ही भोळसट कल्पना आहे. एखाद्या गरीब लहान मुलाने सतत कल्पना केली की मला सायकल मिळेल.. मिळेल.. म्हणून त्याला सायकल मिळाली असे घडत नाही.

या एक प्रकारच्या आपण स्वतःलाच दिलेल्या स्वयंसूचना असतात किंवा त्याला आपण असं म्हणूया की स्वसंमोहन असते. अंधश्रद्धा आणि चमत्कारावर विश्वास ठेवणारी मंडळी ही यामध्ये जास्त भरडली जातात. एक प्रकारे हे आपणच आपल्यात निर्माण केलेले भंपक विज्ञान असते.
ते… कोणतेही सीक्रेट वगैरे नसते!!

  • डाॅ. प्रदीप पाटील
error: Content is protected !!