भाष्य व प्रत्यक्ष अनुभव: एक सूक्ष्म सीमारेषा

पंधरा-वीस साधू हिमालय चढत होते. एका पत्रकाराने त्यांना थांबवलं आणि विचारलं – “बाबा, एवढे सगळे कुठं चाललात?”

बाबा शांतपणे उत्तरले –
“समाधी घेणार आहोत.”

पत्रकार (आश्चर्याने) – “समाधी? पण का बरं?”

बाबा थोडं हसले, थोडं उदास झाले आणि म्हणाले, “आता जगाला आमची गरजच उरलेली नाही रे. सोशल मिडिया आल्यापासून दररोज नवे ज्ञानी जन्माला येतात. आम्ही आयुष्य घालवलं आत्मशोधात, आणि इथे दोन मिनिटांच्या रील्स मधून लोकं ज्ञान देतात! आम्ही आता ‘आउटडेटेड’ झालो.

कोणतेही क्षेत्र असो—कला, क्रीडा, उद्योग, व्यवसाय, चित्रपट किंवा इतर—त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष कृती आणि त्यावर केले जाणारे भाष्य, समीक्षण किंवा सल्ला यांच्यामध्ये मूलभूत फरक असतो. अनेकदा आपण पाहतो की एखादी गोष्ट प्रत्यक्ष करणे आणि त्या गोष्टीविषयी बोलणे या दोन गोष्टी एकमेकांपासून खूप दूर असतात.

उदाहरणार्थ, उद्योग सल्लागारांकडे व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास असतो, परंतु प्रत्येक सल्लागार यशस्वी उद्योजक होतोच असे नाही. तसेच, उत्कृष्ट क्रिकेट कॉमेंटेटर अनेकदा स्वतः खेळाच्या मैदानात मोठी कामगिरी करत नाहीत. चित्रपट समीक्षक अनेकदा इतरांच्या दिग्दर्शनावर भाष्य करतात खरं, पण प्रत्यक्ष चित्रपट दिग्दर्शनासाठी वेगळेच कौशल्य लागतं.

हे सर्व काही त्यांच्या भूमिकेचं महत्त्व कमी करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या मर्यादा ओळखण्यासाठी आवश्यक आहे. समीक्षक, सल्लागार किंवा भाष्यकार हे अभ्यासपूर्ण आणि व्यापक दृष्टिकोन नक्कीच देतात. त्यांचे विश्लेषण बहुमोल ठरते. मात्र, गोष्टी प्रत्यक्ष कृतीत उतरवणं, तिथल्या दबावाखाली निर्णय घेणं, आणि त्यातून परिणाम साधनं ही वेगळीच पातळी असते.

त्या अनुषंगाने, कोणत्याही गोष्टीवर टीका करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी — की आपण एका परिप्रेक्ष्यातून पाहतो आहोत, आणि त्यालाही एक मर्यादा आहे. टीका ही स्वच्छंदतेने दिली जाणारी प्रतिक्रिया नसून, ती एका जबाबदारीने दिली गेलेली निरीक्षणात्मक प्रतिक्रिया असावी. अन्यथा, ती टीका न होता केवळ मतप्रदर्शन ठरेल.

शेवटी:
“सल्ल्याला किंमत तेव्हाच असते, जेव्हा तो अनुभव आणि आत्मपरीक्षणातून दिला जातो.”

error: Content is protected !!