सॉरी आणि थँक्स

आपल्या रोजच्या बोलण्यात काही शब्द इतके सहज मिसळून गेले आहेत की ते परके वाटतही नाहीत. सॉरी आणि थँक्स हे त्यातीलच दोन शब्द. इंग्रजी भाषेतून आलेले असले तरी आपण ते इतक्या वेळा वापरले आहेत की ते आता आपल्या दैनंदिन व्यवहाराचा भागच झाले आहेत.

पण या शब्दांचं खरं वैशिष्ट्य त्यांच्या परकीयपणात नाही तर त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या ताकदीत आहे. इतक्या थोडक्यात आणि नेमक्या पद्धतीने मनातील भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता दुसऱ्या कुठल्याही मोठ्या इंग्रजी वाक्यात क्वचितच आढळेल.

सॉरी : अहंकाराला बाजूला ठेवण्याची तयारी

सॉरी हा शब्द फक्त चूक मान्य करण्यासाठी नसतो. त्यामागे असते एक मनापासून केलेली विनंती. माझ्या बोलण्यातून किंवा कृतीतून काही चुकलं असेल तर कृपया मला मोठ्या मनाने माफ करा अशी नम्र भावना त्या एका शब्दात दडलेली असते. खरं तर सॉरी बोलणं म्हणजे स्वतःचा अहंकार थोडा बाजूला ठेवणं. आपणही चुकू शकतो हे मान्य करणं. म्हणूनच हा शब्द फक्त भाषिक नाही तर मानवी नात्यांना जपणारा शब्द आहे.

थँक्स: कृतज्ञतेसाठीचा शब्द छोटा भाव मोठा

तसंच थँक्स हा शब्दही साधा वाटतो पण त्यामागची भावना खूप खोल असते. तुम्ही केलेल्या मदतीबद्दल, सहकार्याकरीता किंवा एखादी गोष्ट समजून घेतल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता त्या एका शब्दात सामावलेली असते. थँक्स म्हणणं म्हणजे आपण सगळं काही स्वतःच केलं नाही हे मान्य करणं. कोणीतरी आपल्या प्रवासात हातभार लावला आहे याची जाणीव ठेवणं. मानवी संबंधांमध्ये मोठमोठ्या भाषणांची गरज नसते. अनेकदा दोन शब्द पुरेसे असतात. सॉरी गैरसमज दूर करतो. थँक्स नात्यात गोडवा निर्माण करतो.

हे दोन शब्द लहान असले तरी ते संवादाला नम्रता देतात, नात्यांना आदर देतात आणि माणुसकीला थोडी अधिक जागा देतात. कधी कधी भाषेची खरी ताकद मोठ्या शब्दांत नसते. ती अशा छोट्या छोट्या शब्दांत असते जे थेट मनापासून मनापर्यंत पोहोचतात. आणि कदाचित म्हणूनच सॉरी आणि थँक्स हे शब्द साधे असूनही मौल्यवान आहेत.

error: Content is protected !!