रंग का येत नाही?

एका माणसाने कात बनवायचा कारखाना सुरू केला. पण सुरुवातीपासूनच त्याचा कात पानाला हवा तसा गडद रंगच आणत नव्हता.

हळूहळू ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या—”तुमचा कात पान रंगवत नाही!”

हवालदिल झालेल्या कारखानदाराला ओळखीतल्या केमिकल इंजिनिअरने एका पुरवठादाराचं नाव सुचवलं—तो म्हणाला, “त्याच्याकडचा खास जिन्नस मिसळला, की तुमचा कात पानाला रंग देईल.”

कारखानदार दोन वर्षं तो जिन्नस मोठ्या प्रमाणात घेत राहिला—सातशे रुपये किलो दराने. पण नंतर एक अनुभवी पानवाला भेटला आणि त्याने स्पष्ट केलं—
“तुमच्या काताच्या कच्च्या मालात गडबड आहे म्हणून पान रंगत नाही—ते आधी सुधारून घ्या. आणि तुम्हाला रंग यावा म्हणून सांगितलेला खास जिन्नस दुसरं तिसरं काही नसून, साधी हळद आहे. पानातल्या चुन्याबरोबर तिच्या रासायनिक प्रक्रियेतून तो लाल रंग तयार होतो!”

तेव्हा कुठे कारखानदाराला कळलं— इतके दिवस तो समस्येच्या मुळाशी पोचलेलाच नव्हता.

तात्पर्य – आयुष्यात खरा रंग यायला हवा असेल, तर नेमकं काय चुकतंय हे ओळखणं गरजेचं असतं. नाहीतर लोकांच्या सांगण्यावर भरवसा ठेवून, आपण महागडे उपाय करत राहतो— जे केवळ फसवणूक ठरतात. बाह्य झगमगाटानं रंग भरायचा कितीही प्रयत्न केला, तरी तो रंग शेवटी नकलीच ठरतो.

error: Content is protected !!