टायमिंग: द मास्टर स्ट्रोक

यशस्वी माणसाच्या आयुष्यात अनेक गुण असतात—मेहनत, चिकाटी, कल्पकता, ज्ञान आणि धाडस. पण हे सगळं असूनही, एका गोष्टीची कमतरता असेल, तर यश हुलकावणी देऊ शकतं. ती गोष्ट म्हणजे टायमिंग!

योग्य क्षणी घेतलेला निर्णय इतिहास घडवतो, आणि चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय संधी हातातून घालवतो. क्रिकेटमध्ये चेंडूला ताकदीनं मारलं तरीही, जर तो योग्य कोनात आणि अचूक क्षणी बॅटवर लागला नाही, तर चौकार किंवा षटकार होत नाही. उलट, तो झेलबाद होण्याची शक्यताच जास्त! हेच टायमिंग. आयुष्याचा खेळही असाच असतो—योग्य वेळी मारलेला फटका विजय निश्चित करतो.

संधी कधीही, कुठेही येऊ शकते. पण ती ओळखायचं कसब आणि तिला उचलायचं धाडस फार कमी लोकांकडे असतं. १९९०च्या दशकात इंटरनेट आलं होतं, पण त्यात भविष्यातली क्रांती कोणाला दिसली? गुगल, ऍमेझॉन, फेसबुक यांना (त्यांच्या संस्थापकांना)! त्यांनी वेळीच पाऊल टाकलं आणि जग बदललं. तसंच भारतात—धीरूभाई अंबानींनी भविष्य जाणलं आणि भारतात मोबाईल क्रांती झाली (कॉलिंगच्या बाबतीत). पण हेच रिलायन्स वेळेच्या आधीच डेटा साठी सुसज्ज झालेलं म्हणून नंतर फेलही गेलं. जिओ ने मात्र परफेक्ट टायमिंग साधत प्रस्थापितांना चांगलाच धोबीपछाड दिला!

संधी दिसणं वेगळं, आणि त्या क्षणी तिचा फायदा घेणं वेगळं. २००७ मध्ये स्मार्टफोनचं युग सुरू होत असताना बऱ्याच कंपन्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पण ऍपलने त्याच वेळी आयफोन आणला आणि बाजार गाजवला. कुठलाही मोठा खेळाडू फक्त वाट बघत नाही, तो संधीची चाहूल लागताच योग्य कृती करतो. हाच टायमिंगचा मास्टरस्ट्रोक!

खरं तर संयम आणि टायमिंग ही यशाची जोडगोळी आहे. बियाणं पेरलं, की लगेच पीक येतं का? नाही. त्याला वेळ लागतो. जर गरजेपेक्षा लवकर पेरलं, तर पीक खराब होतं. उशिरा केलं, तरी काहीच हाती लागत नाही. तसंच आयुष्यातही आहे—संधी आली म्हणून लगेच उडी मारायची नाही, आणि उशीर करून हात वर करायचेही नाहीत. संयम हवा. संयम म्हणजे निष्क्रियता नाही, तर योग्य क्षणासाठी तयार राहणं. संधी हेरून योग्य वेळी झडप घालणं हेच टायमिंग आहे!

शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारताना संयम आणि टायमिंग दोन्ही अचूक राखले. त्यांनी खानाच्या गोड बोलण्याला भुलून तातडीने प्रतिक्रिया दिली नाही, तर तयारीने आणि शांतपणे संधीची वाट पाहिली. अफजलखानाने विश्वासघात करून वार करायचा प्रयत्न केला, तेव्हा महाराजांनी त्याच क्षणी वाघनखाने प्रहार करून त्याचा कोथळा बाहेर काढला. जर त्यांनी आधी किंवा उशिरा वार केला असता, तर धोका वाढला असता. त्यांच्या संयमाने धोका टाळला, आणि टायमिंगने विजय निश्चित केला.

होय! टायमिंग हा नशिबाचा खेळ नाही, तो अनुभव आणि निरीक्षणातून येतो. लोक कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत आणि भविष्यात काय महत्त्वाचे ठरेल, हे ओळखण्याची नजर असेल, तर कोणीही टायमिंगचा मास्टर बनू शकतो.

शेवटी, यशस्वी माणसाला लोक भाग्यवान म्हणतात खरं, पण तो संधीच्या लाटेवर उभा असतो – योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कृतीसाठी तयार!

error: Content is protected !!