एक साधू गावाजवळ आश्रमात राहत होता. गावातील लोक त्याचा खूप आदर करत. ते त्याला अन्न फळे वस्त्र देत आणि त्याचे विचार ऐकत. त्या गावातच एक भिकारी राहत होता. त्याला हे सगळं पाहून जळफळाट व्हायचा. तो मनात म्हणायचा, “मीही लोकांकडून मागून खातो आणि हा साधूही लोकांनी दिलेल्यावरच जगतो. मग लोक त्याला एवढा मान का देतात आणि मला का नाही?”
एक दिवस तो साधूकडे गेला आणि म्हणाला, “तुम्ही आणि मी दोघेही भिकारीच आहोत. मी उघडपणे भिक्षा मागतो आणि तुम्ही लोकांनी दिलेल्यावर जगता. पण तुम्ही इतक्या सुखात राहता आणि लोक तुमचा सन्मान करतात. असा फरक का?” साधू शांतपणे म्हणाला, “जर तुला असं वाटत असेल तर एक काम करूयात. मी आत्ता हा आश्रम सोडतो आणि तुझ्याबरोबर येतो. आपण दोघेही भटकत भिक्षा मागून जगू.”
भिकारी थोडा आश्चर्यचकित झाला पण त्याला आनंदही झाला. दोघे गाव सोडून चालू लागले. थोड्या वेळाने भिकारी अचानक थांबला. तो म्हणाला, “अरे माझं भिक्षेचं भांडं तिथेच राहिलं. मी जाऊन ते घेऊन येतो.” साधू हसला आणि म्हणाला,
“आता तरी तुला फरक समजला असेल!”
भिकाऱ्याजवळ काहीच नव्हतं तरी तो एका भांड्याला बांधला होता.
साधूकडे बरंच होतं तरी तो कशालाही बांधला नव्हता. फरक आपल्याकडे किती आहे यात नाही. फरक आपण त्याला किती चिकटलो आहोत यात आहे.
थोडक्यात: बंधन वस्तूंमध्ये नसते. बंधन आसक्तीत असते.


